नवी दिल्ली : लडाख सीमेवर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत चीनने तीन वेळा वेगवेगळ्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे चीन वाटाघाटी करण्याचे नाटक करीत आहे, तर दुसरीकडे घुसखोरी करीत आपला खरा चेहरा दाखवत आहे. पण प्रत्येक वेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी चिनी प्रयत्नांना हाणून पाडले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिगेडियर कमांडर लेव्हलवर भारत आणि चीन यांच्यात चर्चा सुरु असताना चीनने चुमार भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनकडून 7-8 मोठी वाहने भारतीय सीमेकडे येत होती. परंतु चेपुजी छावणीजवळ जेथे भारतीय सैन्य आधीच तैनात होतं. त्यांनी चीनी सैनिकांना रोखलं.


आता भारतीय सैन्याच्या वतीने या भागात आणखी सैन्य तैनात करण्यात आले आहेत. चिनी सैन्याच्या चिथावणीनंतर भारतीय सैन्य सध्या हायअलर्टवर आहे.


29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री आणि त्यानंतर 31 ऑगस्टच्या रात्री चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. चीनने पँगोंगच्या दक्षिणेकडील भागात घुसखोरीचा आधी प्रयत्न केला. त्यानंतर 31 ऑगस्टच्या रात्री चीनी सैनिकांना काला टॉप या ठिकाणी घुसण्याचा प्रयत्न केला. चिनी जवान त्या दिशेने येत असताना भारतीय सैनिकांनी त्यांना पाहिले आणि मेगाफोनवर इशारा दिला. त्यानंतर चीनी मागे फिरले.


चीनच्या सतत घुसखोरीच्या प्रयत्नांवर भारताने कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, चीनने सीमेवर उकवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. हा मुद्दा आम्ही राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चीनसमोर ठेवला आहे.


या वादावर मंगळवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, एनएसए अजित डोभाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि ताज्या परिस्थितीविषयी माहिती घेतली. सीमेवर असलेल्या चुशुल भागात अजूनही ब्रिगेडियर कमांडर लेव्हलवर चर्चा सुरु आहे. परंतु चीन एकीकडे शांतीचं आवाहन करतो आणि दुसरीकडे घुसखोरी आणि उकसवण्याचा प्रयत्न करत आहे.