चॉकलेट डोसा...काहीही हं...; पाहा Street Food चा विचित्र व्हिडीओ
अनेक पद्धतींनी डोसा बनवला जातो, पण...
मुंबई : अनेकजाणांना तुमच्या आवडीचं स्ट्रीट फूड कोणतं किंवा कम्फर्ट फूड कोणतं असा प्रश्न विचारला असता दाक्षिणात्य पदार्थांना विशेष पसंती दिली जाते. प्रवासादरम्यान, ब्रेकफास्ट म्हणून या पदार्थांना अधिक पसंती मिळते. त्याच यादीतील एक पदार्थ म्हणजे डोसा.
साधा डोसापासून अगदी मसाला, मैसूर मसाला, अंडा मसाला, पनीर, शेजवान अशा अनेक पद्धतींनी डोसा बनवला जातो. डोसावर या टॉपिंगपर्यंत ठीक होतं. पण, आता मात्र थेट आईस्क्रीम डोसाच बाजारात आला आहे.
डोसा बॅटर हॉट प्लेटवर टाकून त्यावर आईस्क्रीमचा स्कूप, वरुन चॉकलेट सीरपची धार आणि त्यावर किसलेलं चॉकलेट टाकून हे सर्व मिश्रण डोसावर बसरवून मग ते शिजल्यानंतर त्याचे रोल कापून हा चॉकलेट डोसा सर्व्ह केला जातो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधत आहे.
विविध प्रकारचे डोसे स्ट्रीट फूडच्या रुपात समोर येण्यापर्यंत ठीक होतं. पण, थेट डोसा आणि चॉकलेट असं काहीतरी कॉम्बिनेशन समोर आणणं नेटकऱ्यांना काही रुचलेलं नाही. हे पाहून तर आम्ही डोसा खाणं सोडून देऊ इथपासून आमची भूकच पळालीये इथपर्यंतच्य़ा प्रतिक्रिया अनेकांनीच दिल्या आहेत.
स्ट्रीट फूडच्या नावाखाली अनेक विक्रेते काही नव्या संकल्पनांना जन्म देतात. पण, काही संकल्पना या न पटण्याजोग्या असतात. हा चॉकलेट डोसा काही खवय्यांसाठी त्यापैकीच एक ठरत आहे. तुम्ही असा एखादा विचित्र पदार्थ कधी पाहिला किंवा चाखला आहे का?