CJI Chandrachud Angry in SC: कायम हसरा चेहऱ्याने अनेक प्रकरणांची सुनावणी करणारे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड (CJI Chandrachud) आज चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं. मवाळ स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रचूड यांचा आवाजही आज बोलताना कमालीचा वाढला होता. चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांना कोर्टातून बाहेर जाण्यास सांगितलं. 


नेमकं घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्षांनी (SC Bar association president ) वकिलांच्या चेंबरशीसंबंधित एका प्रकरणाची सुनावणी न झाल्याच्या मुद्द्यावरुन सरन्यायाधिशांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. सुप्रीम कोर्टाच्या जवळ जुन्या अप्पू घर परिसरामध्ये फार पूर्वी कोर्टाच्या एक्सटेंशनसाठी जमीनीचा तुकडा मंजूर करण्यात आला होता. मात्र येथील संपूर्ण जमीन ही वकिलांसाठी चेंबर बनवण्यासाठी वापरली जावी अशी वकिलांची मागणी आहे. केवळ एका ठराविक नियोजित ब्लॉकमध्येच चेंबर बनवण्यास ते अपुरं ठरेल असा वकिलांचा युक्तीवाद आहे. एक ठराविक ब्लॉक वगळून उर्वरित जागेमध्ये सुप्रीम कोर्टाशी संबंधित वेगवेगळ्या विभागांची कार्यालये उभारण्याची योजना आहे. यासंदर्भात बार असोसिएशनने अनेकदा याचिकेवर सुनावणी करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टासमोर झालेली नाही.


सरन्यायाधीशांनी दिला नकार


ज्येष्ठ वकील आणि सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी पुन्हा एकदा सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. ए. एस. नरसिम्हा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर हा विषय मांडला. त्यांनी या प्रकरणात लवकरात लवकर सुनावणी केली जावी अशी मागणी केली. सुनावणी करण्यात येणाऱ्या प्रकरणांच्या यादीमध्ये हे प्रकरण प्राधान्य क्रमाने घ्यावं असं सिंह यांचं म्हणणं होतं. मात्र सरन्यायाधीशांनी या प्रकरणाला वेगळ्या पद्धतीने हाताळलं जाणार नाही आणि वेगळं प्राधान्य दिलं जाणार नाही असं स्पष्ट केलं. इतर प्रकरणांप्रमाणेच हे प्रकरण हाताळलं जाईल आणि यादीनुसार त्याची सुनावणी होईल असं सरन्यायाधीशांनी सांगितलं.


त्या विधानामुळे सरन्यायाधीश संतापले


सरन्यायाधीशांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर विकास सिंह यांनी धमकीच्या स्वारात यासाठी मला सरन्यायाधीशांच्या घरापर्यंत जावं लागलं तरी चालेल. मात्र हे विधान ऐकून सरन्यायाधीश चंद्रचूड फारच नाराज झाले. त्यांनी अगदी मोठ्या आवाजामध्ये, "तुम्ही मला अशाप्रकारे धमकी देऊ शकत नाही. मी कधी कोणाच्या दबावाला बळी पडलेलो नाही. यापुढे माझ्या 2 वर्षांच्या कार्यकाळातही मी असं होऊ देणार नाही. तुम्ही तातडीने कोर्टाबाहेर निघून जा. तुम्हाला यावरुन जे काही राजकारण करायचं आहे ते कोर्टाच्या बाहेर जाऊन करा," असं विकास सिंह यांना सांगितलं.


नंतर कोर्टाने दिली तारीख


सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी नंतर 17 मार्चची तारीख दिली. मात्र त्या दिवशीच्या सुनावणीच्या यादीमध्ये हे प्रकरण पहिल्या क्रमांकावर ठेवण्यास नकार दिला. यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणामध्ये सुनावणीसाठी न्यायालयामध्ये उपस्थित असलेले वरिष्ठ वकील कपिल सिब्बल आणि नीरज किशन कौल यांनी या घडलेल्या घटनेसंदर्भात खेद व्यक्त केला आणि सर्व वकिलांच्यावतीने सरन्यायाधीशांची माफी मागितली.