`...मला माफ करा`, अखेरच्या भाषणात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड झाले भावूक
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज म्हणजेच शुक्रवारी निवृत्त झाले आहेत. आपल्या समारोपाच्या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना ते भावूक झाले.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज म्हणजेच शुक्रवारी निवृत्त झाले आहेत. आपल्या समारोपाच्या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना ते भावूक झाले. यावेळी त्यांनी जर आपण कधी कोणाला दुखावलं असेल तर त्यांची माफी मागतो असं म्हटलं.
आपल्या समारोपाच्या भाषणात डी वाय चंद्रचूड म्हणाले की, "या कोर्टामुळे मला रोज चालना मिळत होती. आपण ज्यांना ओळखतही नाही अशा लोकांना यानिमित्ताने भेटण्याची संधी मिळते. मी तुमच्यातील प्रत्येकाचे आभार मानतो. आलेलं प्रत्येक प्रकरण नवीन होतं आणि आधीच्या केसपेक्षा वेगळं होतं. जर मी कोर्टात कधी कोणाला दुखावलं असेल तर मी माफी मागतो. मला माफ करा. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात त्याबद्दल मी आभारी आहे," असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले.
सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना या पदाचा पदभार स्विकारणार आहेत. सेरेमोनियल बेंचचं नेतृत्व करताना डी वाय चंद्रचूड यांनी समारोपाचं भाषण केलं. सेरेमोनियल बेंच सूचीबद्ध होण्यापूर्वी 'माझ्याकडून शक्य तितक्या प्रकरणांची' सुनावणी करम्याचा प्रयत्न होता असा खुलासा त्यांनी केला.
"माझ्या स्टाफने जेव्हा मला उद्या कोणत्या वेळेला सेरेमोनियल बेंच किता वाजता सूचीबद्ध करायचा आहे असं विचारलं, तेव्हा त्यांना मी सांगितलं की शक्य होतील तितकी प्रकऱणं सुनावणीसाठी ठेवा. अखेरच्या क्षणी शक्य तितके न्याय करण्याची संधी मला गमवायची नाही असं मी सांगितलं," असा खुलासा डी वाय चंद्रचूड यांनी केला. डी वाय चंद्रचूड यांनी दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबरमध्ये देशाचे 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारला होता.
मे 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेल्या निवृत्त सरन्यायाधीशांनी नमूद केले की त्यांच्या अंतिम भाषणासाठी इतके लोक उपस्थित आहेत हे पाहून नम्र वाटलं. “काल रात्री, मी विचार करत होतो की दुपारी 2 वाजता कोर्ट रिकामे होईल आणि मी स्क्रीनवर स्वतःकडे पाहत असेन. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने मी विनम्र झालो आहे. आपण येथे यात्रेकरू, पक्षी म्हणून थोड्या वेळासाठी आलो आहोत, आपले काम करुन निघून जाऊ,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.