रंजन गोगोईंनंतर मराठमोळे शरद बोबडे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश?
सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या न्यायमूर्ती शरद बोबडे यांची निवड होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीशपदी निवड झाल्यास बोबडे हे ४७ वे सरन्यायाधीश असतील. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून बोबडे यांच्या नावाची शिफारस कायदा मंत्रालयाला करण्यात आली आहे. प्रक्रियेनुसार सध्याचे सरन्यायाधीश पुढच्या सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस सरकारकडे पाठवतात. सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती भवनातून होते. बोबडे यांची नियुक्ती झाल्यास १८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल.
कोण आहेत शरद बोबडे?
सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शरद बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपूरमध्ये झाला. नागपूर विश्वविद्यालयातून बोबडेंनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. १९७८ साली ते महाराष्ट्र बार काऊंन्सिलचे सदस्य बनले आणि १९९८ साली वरिष्ठ अधिवक्ता म्हणून त्यांची नेमणूक झाली.
२९ मार्च २००० साली बोबडेंची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदावर निवड करण्यात आली. १६ ऑक्टोबर २०१२ साली ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. सर्वोच्च न्यायालयात सध्या रंजन गोगोईंनंतर बोबडे हे सगळ्यात वरिष्ठ आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी लागोपाठ ४० दिवस अयोध्या खटल्याची सुनावणी केली. बुधवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. गोगोई निवृत्त व्हायच्याआधी म्हणजेच १७ नोव्हेंबरच्या आत अयोध्या खटल्याचा निकाल येणार आहे.