Crime News : उत्तर प्रदेशातील (UP Crime) अयोध्येत (ayodhya) शाळेच्या टेरेसवरून पडून दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अयोध्या शहरातील सनबीम शाळेत शुक्रवारी सकाळी 8.45 च्या सुमारास ही मुलगी शाळेच्या टेरेसवरुन खाली पडली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे शाळा सुरु नसतानाही या मुलीला शाळेत बोलवण्यात आले होते. त्यानंतर मुलगी झोपाळ्यावरुन पडून जखमी झाली आहे अशी माहिती शाळेने तिच्या पालकांना दिली होती. त्यानंतर आता या प्रकरणाने वेगळंच वळण घेतले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) याप्रकरणी मुख्याध्यापकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील प्रतिष्ठित अशा सनबीम शाळेमध्ये शुक्रवारी सकाळी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आत्तापर्यंत विद्यार्थिनीचा झोपाळ्यावरुन पडून मृत्यू झाल्याचे सांगून शाळेच्या मुख्याध्यापकांकडून कुटुंबीयांची फसवणूक केली होती. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलगी शाळेच्या छतावरुन खाली पडल्याचे समोर आले आहे. यामुळे आता शाळा प्रशासन संशायाच्या भोवऱ्यात आले आहे. 


नेमकं काय  झालं?


पोलिसांनी सांगितले की, "सबनीम शाळेत हा सर्व प्रकार घडला आहे. दहावीत शिकणाऱ्या एका मुलीला शाळेच्या व्यवस्थापकाने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. मुलीच्या कुटुंबीयांना देखील याबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थ्यीनीचा मृत्यू झाला. पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, टेहळणीच्या आधारे योग्य तपास करून कारवाई करण्यात येणार आहे."


पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही समोर आले आहे की, शाळा प्रशासनाने कुटुंबीयांना आणि पोलिसांना खोटे सांगितले आणि ज्या ठिकाणी विद्यार्थिनी पडली होती त्या ठिकाणाहून रक्ताचे डागही साफ केले होते. पोलिसांनी या प्रकरणी शनिवारी दुपारी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारी शाळेच्या मुख्याध्यापक, शाळेचा व्यवस्थापक आणि एका  शिक्षकाविरुद्ध सामूहिक बलात्काराचा कट रचणे, खून करणे आणि इतर अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी स्पोर्ट टिचर अभिषेक कनोजियाला अटक केली आहे.


कुटुंबियांचा गंभीर आरोप 


दुसरीकडे, शुक्रवारी सुट्टी असतानाही शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी भाटिया यांनी षड्यंत्र रचून आपल्या मुलीला शाळेत बोलावले. त्यानंतर शाळेचे व्यवस्थापक ब्रिजेश यादव आणि  अभिषेक कनोजिया यांनी मिळून मुलीवर बलात्कार केला आणि हा सर्व प्रकार लपवण्यासाठी तिला गच्चीवरून खाली फेकून दिले. यामुळे मुलीचा मृत्यू झाला, असा कुटुंबियांचा आरोप केला आहे. दरम्यान, मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तीन डॉक्टरांच्या समितीने केले असून, त्यांच्या अहवालाची वाट पाहिली जात आहे.