`सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद`, चीनच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोदींना पाठिंबा
लडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
मुंबई : लडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. 'भारताला शांतता हवी आहे, पण याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा नाही. चीनचं वागण विश्वासघाताचं आहे. भारत मजबूत आहे, मजबूर नाही,' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
'आम्ही सगळे एक आहोत, हीच भावना आहे. आम्ही पंतप्रधान मोदींसोबत, आमच्या सैन्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. आपल्या सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद आहे,' असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या बैठकीत केलं.
पंतप्रधानांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज्यातून मुख्यमंत्र्यांसह शरद पवारही उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.