लखनऊ : उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरमधील खासदार आणि आमदारामध्ये झालेल्या बूट मारीच्या प्रकरणावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई केली जाईल कारण भाजपा एक शिस्तबद्ध पार्टी असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकारचे कृत्य सहन केले जाणार नाही. याआधी मेंहदवाल आमदार राकेश सिंह बघेल यांनी खासदार शरद त्रिपाठी यांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले. सकाळी प्रदेश अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्याशी बोलल्यानंतर आमदाराने आंदोलन थांबवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष सेतवान राय यांनी या घटनेची निंदा केली. जिल्हाधिकारी रवीश कुमार गुप्ता यांनी सध्या या प्रकरणावर आपली कोणती प्रतिक्रिया दिली नाही. प्रदेश अध्यक्ष डॉ. महेंद्र नाथ पांडे यांनी देखील या कृत्याची निंदा केली. खासदार आणि आमदारात झालेल्या बुटमारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.


अखिलेश यांची प्रतिक्रिया 


संत कबीर नगर येथे झालेल्या बूटमारी प्रकरणावर अखिलेश यादव म्हणाले, 'जिथे पंतप्रधान घुसून मारण्याची आणि सीएम ठोकून काढण्याची भाषा करणार तिथे असंच होणार.' पंतप्रधान आणि मुख्यमंत्री जिथे हाणामारीची भाषा करतात तिथे हाणामारीच होणार असे ते म्हणाले. अशा प्रकारच्या भाषा लोकशाहीत वापरल्यामुळे अशा घटना घडतात असे ते म्हणाले.


श्रेयवादावरून भांडण 



भाजपा खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपा आमदार राकेश बघेल यांच्यामध्ये मिटींगमध्येच बाचाबाची झाली. यानंतर आमदाराने खासदाराला चपलेने मारण्याची भाषा केली. पण याआधीच भडकलेल्या खासदाराने ते कृतीत आणले. स्वत:ची चप्पल काढून तो आमदाराला मारू लागला. आमदाराचा एक हात पकडून त्याला चपलेने डोक्यावर मारायला सुरूवात केली. 
श्रेय घेण्यावरून हा वाद सुरू झाला. भाजपाचे खासदार शरद त्रिपाठी हे संत कबीर नगरचे खासदार आहेत. आमदार राकेश सिंह मेहदावल हे भाजपाचे आमदार आहेत. दोन्ही नेत्यांनी एका मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाच्या नंतर श्रेय घेण्यासाठी हा वाद घातला. दरम्यान एकमेकांना शिवीगाळही केली.