भोपाळ : मध्यप्रदेशच्या राजगड जिल्ह्यात रविवारी सीएएच्या समर्थनात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. पण या दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि प्रशासनामध्ये विवाद झाला. राजगडच्या कलेक्टर निधी निवेदिता यांनी कलम १४४ लागू असल्याने भाजप कार्यकर्त्यांना निदर्शनं करण्यापासून रोखलं. पण भाजप कार्यकर्ते काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या दरम्यान महिला जिल्हाधिकाऱ्यांनी एक नेत्याचा कानशिलात लगावली. त्यानंतर वाद आणखी चिघळला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये २ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजगड जिल्हा मुख्यालयासमोर सीएएच्या समर्थनात काढलेली रॅली पोहोचली. कलम १४४ लागू असल्याने भाजपला कार्यक्रमाची परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे कलेक्टर निधी निवेदिता आणि पोलिसांनी त्यांना रॅली करण्यापासून रोखलं. पण कार्यकर्ते काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.


कलेक्टर निधी निवेदिता यांनी भाजप नेत्यावर हात उचलल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. राजगड जिल्ह्यामध्ये शनिवारी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. पोलिसांनी या सगळ्या घटनेनंतर ८ ते १० भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 



कलेक्टर निधी निवेदिता यांनी कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार असल्यांचं म्हटलं आहे. या प्रकरणात भाजपच्या एका माजी आमदारावर ही कारवाई करण्यात आली आहे.


दुसरीकडे उप जिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांनी देखील भाजप कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगालवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. या घटनेचा ही व्हिडिओ समोर आला आहे. सध्या या ठिकाणी तणावाचं वातावरण आहे.