शरद पवारांना `लोभी` म्हणणाऱ्या काँग्रेसच्या अलका लांबा यांनी अखेर दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या `जे काही म्हणाले...`
Alka Lamba on Sharad Pawar: अदानी प्रकरणावरुन (Adani) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत त्यांना लोभी म्हटल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका (Alka Lamba) लांबा आता बॅकफूटवर जाताना दिसत आहे. अलका लांबी यांनी आपलं ट्विट हे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
Alka Lamba on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून (Joint Parliamentary Committee) चौकशी करण्याऐवजी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे. एकीकडे विरोधक अदानी (Adani) प्रकरणावरुन आक्रमक झाले असताना शरद पवार यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) फूट पडल्याची चर्चा रंगली होती. त्यातच काँग्रेस नेत्या अलका लांबा (Congress Alka Lamaa) यांनी शरद पवारांना लोभी म्हणत ट्वीट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजपानेही त्यांच्या या ट्विटवर टीका केली असून इतक्या वर्षांच्या सहकारी पक्षाच्या प्रमुखांवर अशा शब्दांत टीका करणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. यानंतर आता अलका लांबा बॅकफूटवर जाताना दिसत असून स्पष्टीकरण दिलं आहे.
अलका लांबा यांनी ट्विट केल्यानंतर भाजपाने ही काँग्रेस पक्षाची भूमिका असून, पक्षाचं अधिकृत विधान आहे का? अशी विचारणा केली आहे. त्यानंतर आता अलका लांबा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अलका लांबी यांनी हे आपले वैयक्तिक विचार असल्याचा दावा केला आहे.
अलका लांबा यांनी भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देत आपण शरद पवारांसंबंधी केलेलं विधान हे पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचं सांगितलं आहे. पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मांडली जाते असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की "मी एक काँग्रेस कार्यकर्ता आहे. माझे ट्विट माझ्या खासगी हँडलवरुन मांडण्यात आलेले वैयक्तिक विचार आहेत. त्यांची जबादारी आणि उत्तरदायित्व माझ्याकडे आहे. पक्षात लोकशाही असून प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे".
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
शरद पवार यांनी संयुक्त संसदीय समितीच्या (JPC) मागणीला माझा आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. पण जेपीसीवर सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असेल. त्यामुळे सत्य बाहेर येणार नाही. जेपीसीपेक्षा कोर्टाची समिती अधिक उपयुक्त आणि प्रभावी राहील. जेपीसी स्थापन करुन काहीच उपयोग होणार नाही असं विधान केलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र शरद पवार यांचे मत काहीही असो, पण या घोटाळ्याचे सत्य बाहेर येण्यासाठी जेपीसी चौकशी झालीच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे.
अलका लांबा यांच्या कोणत्या ट्वीटवरुन वाद?
शरद पवार यांच्या या विधानानंतर अलका लांबा यांनी ट्विटरला शरद पवार आणि गौतम अदानी यांचा एक फोटो शेअर केला होता. फोटो ट्विट करत त्यांनी लिहिलं होतं की "घाबरलेले लोभी लोक आज आपल्या वैयक्तिक हितांसाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगाण गात आहेत. एकटे राहुल गांधी देशातील लोकांची लढाई लढत आहेत. चोरांशीही आणि त्यांना वाचवणाऱ्या चौकीदारांशीही".
भाजपाने व्यक्त केलं आश्चर्य
अलका लांबा यांच्या ट्वीटनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आश्चर्य व्यक्त केलं. हे काँग्रेसचं अधिकत विधान आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.
दुसरीकडे फडणवीस यांनी "राजकारण होतच राहील. पण, काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा 35 वर्ष मित्रपक्ष आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री असणाऱ्यांबद्दल केलेले ट्विट दुर्दैवी आहे. भारतातील राजकीय संस्कृतीत राहुल गांधी घाणेरडे राजकारण करत आहेत आणि राजकीय संस्कृतीला काळीमा फासत आहेत," अशी टीका केली.