विनोद पाटील अहमदाबाद : सा-या देशाचं गुजरात विधानसभा निवडणुकीडे लक्ष लागलंय. मात्र गुजरातचं लक्ष लागलंय ते मुख्यमंत्री विजय रुपानींच्या मतदारसंघाकडे. कारण रुपानींच्या विरोधात गुजरातचा सर्वात श्रीमंत उमेदवार काँग्रेसनं रिंगणात उतरवला आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदार असलेल्या इंद्रनील राजगुरू यांनी आपला मतदारसंघ सोडून रुपाणींना विजयाचं आव्हान दिलं आहे. 


सर्वात श्रीमंत उमेदवार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सा-या गुजरातच्या जनतेचं लक्ष लागलंय ते राजकोट पश्चिम मतदारसंघाकडं. कारण या मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपानी हे पुन्हा एकदा नशिब आजमावत आहेत. मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर रुपानींची मुख्मंत्रीपदी वर्णी लागली. २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत  रूपानी २७ हजारांपेक्षा जास्त मतांनी निवडून आले. मात्र यावेळी ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. कारण राजकोट पूर्वचे आमदार आणि गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या इंद्रनील राजगुरू यांना काँग्रेसनं इथून मैदानात उतरवलं आहे. रूपानी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजगुरूंनी त्यांचा पराभव करणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडून रुपानींच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला. राजगुरू गेल्या दीड वर्षापासून या मतदारसंघात तळ ठोकून आहेत.


तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला


हा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र या निवडणुकीत सारी समीकरणं बदलली आहेत. या मतदारसंघात पाटीदार मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळं विजय मिळवण्यासाठी जातीय समीकरणं महत्वाची ठरू शकतात. या मतदारसंघात 3 लाखांपेक्षा जास्त मतदार आहेत. 75 हजार मतदार हे पाटीदार समाजाचे आहेत. तर 35 हजार मतदार क्षत्रिय आहेत. राजगुरू येत असलेल्या ब्राह्मण मतदारांची संख्या 25 हजारांवर आहे. तर 35 हजार वाणी आहेत. रुपानी येत असलेल्या जैनांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे. हार्दिक पटेल फॅक्टर चालला तर पटेलांची नाराजी भाजपला भोवू शकते. मात्र विकासाच्या जोरावर रुपानींचा विजय निश्चित असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत.


पाण्याच्या मुद्द्याने धरला जोर


भाजप विकासाची भाषा करत असलं तरी अजूनही राजकोटमध्ये  24 तास पाणीपुरवठा नाही. त्यामुळे हा मुद्दा चांगलाच जोर धरू लागलाय. या मतदारसंघानं आतापर्यंत दोन मुख्यमंत्री दिले आहेत. 2002 मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर रुपाणींना ही संधी मिळाली.