नवी दिल्ली: २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान (ईव्हीएम) यंत्रांमध्ये फेरफार झाल्याच्या दाव्याचे भाजपकडून सोमवारी जोरदार खंडन करण्यात आले. सय्यद शुजा या अमेरिकी सायबर तज्ज्ञाने लंडन येथील पत्रकार परिषदेत हा दावा केला. एवढेच नव्हे तर या सगळ्याची कल्पना असल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचेही शुजाने म्हटले. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली. यानंतर भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हे सर्व दावे फेटाळून लावले. यावेळी नक्वी यांनी काँग्रेस पक्षाला चांगलेच धारेवर धरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सय्यद शुजाच्या लंडनमधील पत्रकार परिषदेला काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल हेदेखील उपस्थित होते. यावरून टीका करताना नक्वी यांनी म्हटले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सिब्बल यांना लंडनला पाठवले होते. भारतीय लोकशाही व्यवस्थेला बदनाम करण्यासाठी काँग्रेसने सिब्बल यांच्याकरवी सुपारी दिली. काँग्रेसने देशात असताना आमच्यावर कितीही टीका करावी. मात्र, देशाबाहेर जाऊन लोकशाही व्यवस्थेला बदनाम करण्याचे षडयंत्र भारतीय जनता खपवून घेणार नाही, असेही नक्वी यांनी सांगितले. काँग्रेसकडे मुक्तपणे काम करणारे असे अनेक नेते आहेत, जे नरेंद्र मोदींना दूर करण्यासाठी पाकिस्तानात जाऊन मदत मागतात. आतादेखील आगामी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य पराभवाच्या भीतीने काँग्रेस ईव्हीएम मशिनचे भूत उभे करत असल्याची टीका नक्वी यांनी केली.   




सय्यद शुजाच्या दाव्यानुसार लंडनमधील पत्रकार परिषदेसाठी निवडणूक आयोग तसेच राजकीय पक्षांनाही बोलावण्यात आले होते. ही पत्रकार परिषद लंडनमध्ये सुरू असून शुजावर चार दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यापूर्वीही सय्यद शुजा व त्याच्या सहकाऱ्यांवर हल्ले झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.