रांची: लोकसभा निवडणुकीत आपला पराभव होणार, याची जाणीव काँग्रेस पक्षाला झाली आहे. मात्र, आता नामदारांच्या (गांधी कुटंबीय) कपाळी हा कलंक लागू नये, यासाठी  दरबारी नेत्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते बुधवारी झारखंडच्या देवघर येथील प्रचारसभेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी म्हटले की, आपण निवडणुकीत हरणार, याची चाहुल काँग्रेसला लागली आहे. त्यामुळे आता नामदारांना वाचवण्यासाठी हे अपयश कोणाच्या माथी मारायचे, याची योजना आखली जात आहे. त्यासाठीच काँग्रेसकडून सॅम पित्रोदा आणि मणिशंकर अय्यर हे दोन क्रिकेटपटू मैदानात उतरवण्यात आले आहेत. या दोघांनी मैदानात उतरल्यावर लगेचच जोरदार बँटिंग सुरु केलेय. परंतु, काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्यांपासून फारकत घेताना दिसत आहे. मात्र, कर्णधाराच्या आदेशाशिवाय ते इतक्या मुक्तपणे फटकेबाजी करूच शकत नाहीत, असे मोदींनी सांगितले. 


काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखले जाणारे सॅम पित्रोदा यांनी १९८४ सालच्या शीख दंगलीसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने देशभरात बराच गदारोळ निर्माण झाला होता. अखेर काँग्रेसने या वादापासून फारकत घेत आमचा पित्रोदा यांच्या विधानाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले होते. तर राहुल गांधी यांनी त्यापुढे जात तुम्हाला शीख दंगलीसंर्भात केलेल्या वक्तव्याची लाज वाटायला पाहिजे, अशा शब्दांत सॅम पित्रोदा यांना खडसावले होते. 



तर मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी 'नीच' व्यक्ती असल्याच्या आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला होता. २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी मणिशंकर अय्यर यांनी मोदींना 'नीच' म्हटले होते. त्यामुळे काँग्रेसला बऱ्याच टीकेचा सामना करावा लागला होता. काँग्रेस पक्षाने अय्यर यांच्यावर निलंबनाची कारवाईही केली होती. यानंतर हा वाद शमला होता. परंतु, आता मणिशंकर अय्यर यांनी नुकत्याच लिहलेल्या एका लेखात या वक्तव्याचे समर्थन केले. नरेंद्र मोदी यांची अलीकडची वक्तव्ये पाहता मी त्यांच्याबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली ना?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता.