नवी दिल्ली : गुजरात काँग्रेसचे आमदार वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील इगलटोन रिसॉर्टवर आयकर विभागानं छापेमारी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केलेय. राज्यसभेत गुलामनवी आझाद यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. भाजपकडून अपहरणाचा प्रयत्न झालाय. तसेच आमदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रूपयांची ऑफर करण्यात येत आहे. सूडबुद्धीने छापेमारी सुरु आहे, असे ते म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेच्या गुजरातमधील एका जागेवर विजय मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केलेय. तर भाजपनं सूडभावनेतून काँग्रेसच्या नेत्याच्या रिसॉर्टवर छापेमारी केली आहे, असा आरोपही काँग्रेसनं केला आहे.


गुजरातमध्ये सध्या राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने मोठा घोडेबाजार होत आहे. यासंदर्भात अब्दासा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार व प्रवक्ते शक्तीसिंह गोहील यांना भाजपवर गंभीर आरोप केलेत. 


सध्या गुजरातमध्ये पूर परिस्थिती असूनही अनेक आमदार त्यांच्या मतदारसंघाबाहेर आहेत. कारण, भाजपकडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सुरुत. भाजपने यापैकी अनेक आमदारांना १५ कोटी रूपये आणि आगामी निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवायला सुरूवात केल्याचे त्यांनी म्हटलेय.