मोठी बातमी: अखेर ज्योतिरादित्य सिंधियांचा काँग्रेसला रामराम
तब्बल तासभराच्या चर्चेनंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले.
नवी दिल्ली: मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला. त्यामुळे आता ज्योतिरादित्य सिंधिया यांचा भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकता उरली आहे. काहीवेळापूर्वीच ज्योतिरादित्य सिंधिया अमित शाह यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेले होते. याठिकाणी तिन्ही नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा सुरु होती. तब्बल तासभराच्या चर्चेनंतर ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले. सध्या ते आपल्या दिल्लीतील घरी आले आहेत. मात्र, थोड्याचवेळात ते दिल्लीतील भाजप मुख्यालयात जाऊन पक्षात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया आणि नरेंद्र मोदी यांच्यातील भेटीनंतर दिल्ली आणि मध्यप्रदेशातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. काहीवेळापूर्वीच काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल सोनिया गांधी यांच्या १० जनपथ या निवासस्थानी आले. याठिकाणी सध्या त्यांच्यात चर्चा सुरु आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत काँग्रेसमधून २० आमदार बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काठावरचे बहुमत असलेले कमलनाथ सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित आहे. मध्य प्रदेश विधानसभेत सध्या काँग्रेसचे ११४ आणि भाजपचे १०७ आमदार आहेत. तर बसपा २, ४ अपक्ष आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. या सर्वांनी सत्तास्थापनेसाठी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ही समीकरणे पूर्णपणे बदलणार आहेत.