आपला मतदारसंघ टिकवण्यासाठी राजकीय नेते काय करु शकतात याची सर्वांनाच जाणीव आहे. आपला बालेकिल्ला ढासळू नये यासाठी प्रत्येक राजकीय नेता प्रयत्न करत असतो. इतकंच काय तर काही नेत्यांना राजकीय पद आपल्या घराबाहेर दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला मिळू नये असं वाटत असतं. मग त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. उत्तर प्रदेशातील रामपूर नगर परिषदेत असाच एक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अध्यक्षपद महिलांसाठी राखीव झाल्याची घोषणा होताच काँग्रेस नेते मामून शाह खान (Mamun Shah Khan) यांनी पुढील 45 तासात आपल्यासाठी नवरीमुलगी शोधली असून लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

45 वर्षीय ममून शाह खान हे अविवाहित आहेत. पण रामपूर नगरपरिषदेचे अध्यक्षपद (Rampur Municipal Council President) महिलांसाठी राखीव असल्याची घोषणा होताच त्यांनी स्वत:साठी मुलगी शोधण्यास सुरुवात केली. यानंतर पुढील 45 तासाच त्यांनी मुलगी शोधली आणि आपण लग्न करणार असल्याची घोषणा केली. 


स्थानिक राजकारणात असे प्रकार होणं काही नवं नाही. महिलांसाठी जागा राखीव झाल्यानंतर अनेकदा नेते आपल्या पत्नी किंवा इतर महिलेला निवडणुकीत उभे करतात. यानंतर पद त्यांच्याकडे असलं तरी सर्व कारभार मात्र त्यांच्याच हाती असतो. पंचायत या वेब सीरिजमध्येही ही गोष्ट दाखवण्यात आली होती. 


ममून शाह खान हे गेल्या तीन दशकांपासून रामपूर नगरमध्ये काँग्रेसचे ध्वजवाहक आहेत. आपल्या हातून आता अध्यक्षपद जाणार असल्याचं लक्षात येताच त्यांनी वयाच्या 45 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच हा सगळा घटनाक्रम पार पडला. अर्ज भरण्यासाठी 17 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. तर 15 तारखेला खान विवाहबंधनात अडकणार आहेत. 


खरं तर, मामून शाह खान यांनी लग्न न करण्याचा निश्चय केला होता. जोपर्यंत महिला आरक्षणाची घोषणा होत नाही तोपर्यंत ते स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. निवडणूक आणि आपल्या लग्नाची तयारी जोरात सुरु असल्याचं मामून म्हणाले आहेत.


"मी निवडणूक लढावी अशी लोकांची इच्छा होती. यामुळेच मला लग्न करावं लागत आहे. 15 तारखेला मी लग्न करणार असून माझी पत्नी निवडणूक लढेल. कोणत्या पक्षाशी लढायचं याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण मी निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे. लग्नाचीही तयारी झाली आहे," असं मामून खान म्हणाले आहेत.