चिदंबरम यांना पोटदुखी; एम्स रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता
चिदंबरम यांना गेल्या अनेक दिवसांपासून घरचे जेवण मिळत नव्हते.
नवी दिल्ली: आयएनएक्स आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येऊ शकते. चिदंबरम यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे समजते. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत एम्समध्ये नेण्यात आलेले नाही.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नुकतीच चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीला १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. यावेळी चिदंबरम यांनी घरगुती जेवण आणि काही औषधांची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने अंशत: मान्य केली होती. त्यानुसार चिदंबरम यांना दिवसातून एकदा घरातील जेवण मिळणार आहे.
तत्पूर्वी न्यायालयाने अनेकदा ही विनंती फेटाळून लावली होती. चिदंबरम हे ७४ वर्षांचे आहेत. ही बाब ध्यानात घेऊन त्यांना घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी, असा युक्तिवाद चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी केला होता. परंतु सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी त्याला विरोध केला होता. तुरुंगातील सर्व कैद्यांना सारखेच जेवण दिले जाते. प्रशासन कोणताही भेदभाव करू शकत नाही, असे तुषार मेहता यांनी म्हटले होते.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील पी. चिदंबरम यांना तुरुंगात अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले होते. पी. चिदंबरम यांना तुरुंगात झोपायला फक्त चटई दिली आहे. त्यांची उशीही काढून घेण्यात आली. चिदंबरम यांना खाली बसताना त्रास होता. यासाठी त्यांनी खुर्ची मागवली होती. मात्र, तीदेखील काढून घेण्यात आली. रोजच्या जेवणात त्यांना केवळ पातळ डाळ आणि भाकरी खायला मिळते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते.