Rahul Gandhi : राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी, मोठी खळबळ
Death Threat To Rahul Gandhi: काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशात 'भारत जोडो यात्रा' सुरु केली आहे. ही यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. त्यानंतर ही यात्रा पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे. त्याआधीच त्यांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी जीव मारण्याची धमकी मिळाल्याने पोलिसांनी तपासाची सूत्र हलवलीत आहेत. त्याचवेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath)यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
काँग्रेसची (Congress) भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये पोहोचण्यापूर्वीच धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या पत्रात राहुल गांधी आणि कमलनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या पत्रात शीख दंगलीचा उल्लेख आहे. याशिवाय इंदूरमध्ये बॉम्बस्फोट घडवून दहशत निर्माण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राहुल गांधी Bharat Jodo Yatraसाठी इंदूरला पोहोचण्यापूर्वी तिथल्या व्यावसायिकाला धमकीचे पत्र मिळाले आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. (अधिक वाचा- राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन, पुणे आणि मुंबईत जोरदार राडा)
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणी
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जीवे मारण्याची धमकी पत्र गुरुवारी संध्याकाळी कुरिअरद्वारे प्राप्त झाले. जुन्या इंदोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मिठाईच्या दुकानात धमकीचे पत्र सापडले आहे. जुन्या इंदूर पोलीस आणि गुन्हे शाखा पत्र सोडलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. जुन्या इंदोर पोलीस स्टेशन परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पोलीस बारकाईने तपासणी करत आहेत.
राहुल गांधी इंदूर येथे वास्तव्याला राहणार
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशकडे रवाना होणार आहे. 24 नोव्हेंबरच्या आसपास राहुल गांधी इंदूरच्या खालसा स्टेडियममध्ये रात्र विश्रांती घेतील. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत आहे. इंदूरचे पोलीस डीसीपी आरके सिंह यांनी धमकीचे पत्र मिळाल्याला दुजोरा दिला आहे. पत्रात इंदूरमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कमलनाथ यांची पहिली प्रतिक्रिया
काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि कमलनाथ यांना मिळालेल्या धमकीवर कमलनाथ म्हणाले की, सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सुरक्षेबाबत मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. संपूर्ण सुरक्षा पोलिस प्रशासनाच्या हाती आहे, हे पोलिसांना पाहावे लागेल. भाजप नाराज आहे, त्यामुळे काहीतरी प्रत्येकवेळी युक्ती अवलंबली जात आहे.