कर्नाटक : पाच राज्यात भाजपाची पिछेहाट झाल्यानंतर काँग्रेसच्या आत्मविश्वासात वाढ झालेली पाहायला मिळते. सोबत महागठबंधनची ताकद असल्याने आगामी निवडणूकीत भाजपाला जशास तसं उत्तर देण्यास काँग्रेस  सज्ज झाली आहे. पण अंतर्गत वादही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे भाजपाचा महामेरु रोखताना आपल्या नेत्यांच्या रुसव्या फुगव्याकडेही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष द्यावे लागणार आहे. नाहीतर निवडणूका होईपर्यंत नाराजी नाट्याला सामोरे जावे लागणार आहेच. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात शनिवारी झालेल्या फेरबदलांनंतर काँग्रेसमधली नाराजी समोर आली आहे.


भाजपच्या संपर्कात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मंत्रिमंडळात ८ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असला तरी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना वगळण्यात आलंय. रमेश जानकीहोळी यांना डच्चू मिळाल्यामुळे ते नाराज झालेत. त्यांनी थेट काँग्रेस सोडण्याची धमकी दिली आहे. जानकीहोळी गेल्या काही महिन्यांपासून भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय. 


भाजपची खेळी 


दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामलिंगा रेड्डी यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्यांचा गटही पक्षावर नाराज आहे. काँग्रेसमधल्या या बंडखोरीला हवा देऊन आधीच काठावर बहुमत असलेलं सरकार अस्थिर करण्याची खेळी भाजपा खेळू शकतो.