`देशाचा पंतप्रधान फक्त मंदिरांमध्ये दिसतोय, त्यापेक्षा त्यांनी...`, सॅम पित्रोदा यांची PM मोदींवर टीका
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा यांनी धर्म हा खासगी विषय असून, त्याचं राष्ट्रीयकरण करु नका असं म्हटलं आहे. राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर होता कामा नये असंही ते म्हणाले आहेत.
अयोध्या राम मंदिरावरुन देशात सध्या वेगवान हालचाली घडत असून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी यावर नाराजी जाहीर केली आहे. देशात धर्माला फार महत्त्व दिलं जात असून, आपण यामुळे फार चिंतीत असल्याचं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देश राम मंदिर आणि राम जन्मभूमीमध्ये अडकलेला असताना हा ट्रेंड माझ्या मनात फार चिंता निर्माण करत आहे असं इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा म्हणाले आहेत.
सॅम पित्रोदा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक पंतप्रधान संपूर्ण वेळ फक्त मंदिरात दिसत आहे. यामुळे मला चिंता सतावत आहे. त्यांनी मंदिरात जाण्याऐवजी शाळा, ग्रंथालय, विज्ञान केंद्रात जावं. पण वारंवार मंदिरांचा दौरा करु नये असं ते म्हणाले आहेत.
'धर्म ही खासगी बाब'
सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करताना म्हटलं की, "देशाच्या संविधानिक मूल्यांना कमी केलं जात आहे. जेव्हा देशात 10 वर्ष पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती एक पत्रकार परिषदही घेत नाही तेव्हा मला चिंता सतावते. आपण चुकीच्या दिशेने जात आहोत असे संकेत मला मिळत आहेत".
पुढे ते म्हणाले की, "धर्म ही एक खासगी बाब आहे. त्याला राष्ट्रीय अजेंडा बनवू नये. शिक्षण, रोजगार, विकास, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण या गोष्टी अजेंड्यावर असायला हव्यात. याच मूल्यांच्या आधारे तुम्ही एक आधुनिक देश बनवू शकता. तुम्ही कोणत्या धर्माला मानता याच्याशी मला काही देणं-घेणं नाही".
देशाच्या दूरसंचार क्रांतीत मोलाचा वाटा असणारे सॅम पित्रोदा यांनी म्हटलं की, "तुम्ही जे आहात त्यासाठी मी तुमचा सन्मान करेन. तुम्ही कोणता धर्म मानता यासाठी नाही. तुम्ही काय खावं हे मी ठरवणार नाही. किंवा तुम्ही कोणाची पूजा करावी हा तुमचा वैयक्तिक अधिकार आहे. संपूर्ण देश जेव्हा राम मंदिर आणि रामजन्मभूमीत अडकलेला असतो तेव्हा मला खरंच चिंता सतावते. धर्म हा खासगी विषय असून त्याचं राष्ट्रीयकरण करु नका. राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करु नका".
2024 च्या निवडणुकीवर ते म्हणाले की, "या फार महत्त्वाच्या निवडणुका असणार आहेत. आपल्याला नेमकं कसं राष्ट्र हवं आहे हे लोकांना ठरवायचं आहे. त्यांना एका हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची आहे का? की त्यांना एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवं आहे, जिथे विविधता, विकास, स्थिरता यांनाही महत्त्व दिलं जाईल".