मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष सध्या bihar बिहार विधानसभा निवडणुकांकडे लागून राहिलं आहे. कोरोना काळात होणाऱ्या या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित निवडणुकीमुळं देशाच्या राजकीय पटलावरही बऱ्याच घडामोडी घडताना दिसणार आहेत. यातच आता काँग्रेसकडून राजकीय घडी पूर्ववत बसवण्यासाठी म्हणून कंबर कसली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी अतिशय महत्त्वाचा निर्णय़ पक्षाकडून घेण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील आघाडी सरकारवर सातत्यानं निशाणा साधणाऱ्या काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्यावर पक्षानं अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या ३० जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील इतर नेत्यांमधूनही संजय निरुपम यांचीच निवड करण्यात आली आहे. 


पक्षाकडून सोपवण्यात आलेल्या या अतिशय महत्त्वाच्या जबाबदारीबाबत निरुपम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. पक्षासाठी आपण, सर्वोत्तम कामगिरी करणार असल्याचा विश्वास त्यांनी ट्विट करत व्यक्त केला. 



 


दरम्यान, बहुप्रतिक्षित अशा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांनी जोर धरला. या यादीमध्ये खुद्द काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी, प्रियंका गांधी, गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, किर्ती आझाद या आणि इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे. निरुपम यांचं नावही या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे इथं निरुपम यांची राज्यातील भूमिका पाहता देशातील महत्त्वाच्या राजकीय खेळीत त्यांना देण्यात आलेलं स्थान पाहता राजकीय वर्तुळात या निर्णयामुळं बरीच चर्चा सुरु आहे.