मोदींबद्दलचं वादग्रस्त ट्विट डिलीट करायची काँग्रेसवर नामुष्की
गुजरात निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेसमधल्या टीकेनं खालची पातळी गाठली आहे.
नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीआधी भाजप आणि काँग्रेसमधल्या टीकेनं खालची पातळी गाठली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेलं वादग्रस्त ट्विट मागे घ्यायची वेळ काँग्रेसचं ऑनलाईन मॅगझिन 'युवा देश'वर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबतचा एक फोटो युवा देशनं ट्विट केला होता. 'आप लोगोंने देखा विपक्ष मेरे कैसे कैसे मेमे बनवाता है?' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं होतं. 'उसे मेमे नही मेम कहते है' असं कॅप्शन ट्रम्प यांच्या फोटोला देण्यात आलं. त्यानंतर 'तू चाय बेच' असं कॅप्शन थेरेसा मे यांच्या फोटोला देण्यात आलं.
मोदींबद्दलचे हे वादग्रस्त ट्विट अंगाशी आल्यावर युवा देशनं हे ट्विट डिलीट केलं. पण भाजप नेत्यांनी यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचं हे ट्विट गरीब विरोधी आहे, यावरून काँग्रेसची गरिबांबाबतची भूमिका कळते, अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रवीशंकर प्रसाद आणि शाहनवाझ हुसैन यांनीही या ट्विटवरून काँग्रेसवर निशाणा साधला तर काँग्रेस ठराविक कालावधीनंतर अशाप्रकारे आत्महत्या का करतं? असा सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांनी उपस्थित केला आहे.
या ट्विटबद्दल सगळीकडून टीका सुरु झाल्यावर काँग्रेस मात्र बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळतं आहे. अशा प्रकारच्या विनोदबुद्धीचं आम्ही समर्थन करत नाही. आमच्या धोरणांमध्ये आणि मतांमध्ये फरक असला तरी काँग्रेस पंतप्रधान आणि सगळ्या विरोधकांचा आदर करतं, असं ट्विट काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीवेळीही काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मोदी कधीच पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी त्यांना यायचं असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो, असं मणीशंकर अय्यर जानेवारी २०१४ मध्ये म्हणाले होते.