बंगळुरू : कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे. जेडीएसनंही काँग्रेसचा पाठिंबा स्वीकारला आहे. पण या रणनितीनंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्री नकोत म्हणून काँग्रेसच्या लिंगायत समाजाच्या आमदारांनी बंड केलं आहे. कुमारस्वामी हे वोकलिग्गा समाजाचे नेते आहेत. कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे. तरी ११२ जागांचा बहुमताचा आकडा भाजपला गाठता आलेला नाही. भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं देवेगौडांच्या जेडीएसला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामी यांचं नाव पुढे आलं पण काँग्रेसच्याच काही आमदारांनी याला विरोध केला आहे.


काँग्रेसची रणनिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदारांची फोडाफोडी टाळण्यासाठी काँग्रेसनं रणनिती आखल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस त्यांच्या आमदारांना कर्नाटकाच्या बाहेर पाठवण्याच्या तयारीत आहे. या आमदारांना पंजाब किंवा आंध्र प्रदेशमध्ये पाठवलं जाऊ शकतं.


येडियुरप्पांचा सत्ता स्थापनेचा दावा


कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांसोबत बोलताना येडियुरप्पांनी सत्ता स्थापनेसाठी वेळ मागितला असल्याचं म्हटलं.


काँग्रेस-जेडीएसही राजभवनात


दरम्यान काँग्रेस आणि जेडीएसचे नेतेही राजभवनात जाऊन राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचले होते.