कर्नाटकात राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय.
नवी दिल्ली : कर्नाटकातला सत्तासंघर्ष अधिक तीव्र झालाय. कर्नाटकात घटनेची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचा घणाघाती आरोप करत काँग्रेसनं राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. काँग्रेस आणि जेडीएसकडे बहुमत असूनही राज्यपालांनी आपल्याला सत्तास्थापनेचं निमंत्रण न देता भाजपला दिलं, ही गोष्ट काँग्रेसला चांगलीच बोचलीय. या अगोदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदम्बरम, कपिल सिब्बल आणि इतर नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी पी चिदंबरम यांनी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं पालन करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, तसं घडलं नाही... ही गोष्ट कदाचित काँग्रेसलाही जाणवली होती... त्यामुळे त्यांनी राज्यपालांचा निर्णय जाहीर होण्याअगोदरच कोर्टात जाण्याची तयारी केली होती... राज्यपालांनी येडियुरप्पांना सत्तास्थापनेचं निमंत्रण देताच रात्री ११.१५ च्या सुमारास काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं स्पष्ट केलं. गोव्यात संख्याबळाच्या आधारावर सरकार स्थापन होतं तर मग कर्नाटकात का नाही? असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केलाय... तर राज्यपालांवर कुणाचा तरी दबाव असल्याचा आरोप कपील सिब्बल यांनी केलाय.
राज्यपालांचा कौल भाजपला
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापनेचा कौल अखेर भाजपलाच दिलाय. येडियुरप्पा उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केवळ त्यांच्या एकट्याचाच उद्या शपथविधी घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासंदर्भातलं पत्रही राज्यपालांनी येडियुरप्पांना दिलंय. काँग्रेस आणि जेडीएस यांची निवडणूकपूर्व आघाडी नाही. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचा निमंत्रण राज्यापालांनी दिल्याची माहिती भाजप नेते मुरलीधर राव यांनी दिली. मात्र कर्नाटकात घटनेची पायमल्ली झाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या हस्तक्षेपामुळे राज्यपालांनी कर्नाटकात घटनेची हत्या केलीय असा घणाघाती आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केलाय.
काँग्रेस-जेडीएस आमदार अज्ञातस्थळी
काँग्रेस आणि जेडीएसनं आमदार फुटण्याच्या भीतीनं सावध पवित्रा घेतलाय. काँग्रेस आपल्या आमदारांना अज्ञातस्थळी रवाना केलंय. तर जेडीएसच्या सर्व आमदारांना शांग्रिला हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. भाजपकडून आमदारांची सौदेबाजी सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी केलाय. कर्नाटकात सत्तेचा घोडेबाजार तेजीत आल्याचं यावरून दिसतंय. भाजपला बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे. त्यामुळे ते काँग्रेस किंवा जेडीएसच्या आमदारांशी संपर्क साधत असल्याचं पुढं आलंय. भाजपच्या गळाला आपले आमदार लागू नयेत यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं खबरदारी घेतलीय.