नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेमध्ये मंजूर झालं. या विधेयकाच्या बाजूने ३११ खासदारांनी तर विधेयकाच्या विरोधात ८० खासदारांनी मतदान केलं. लोकसभेमध्ये शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला, तर काँग्रेसने विरोध केला. दिल्लीत मंजूर झालेल्या या विधेयकाचे परिणाम महाराष्ट्रातही झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेनं लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी पसरलीय. शिवसेनेनं किमान समान कार्यक्रमाचं पालन करायला हवं, असं मत काँग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केलंय. याबाबत ते लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.


उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण


दरम्यान, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विचारधारांसाठी तयार केलेला कार्यक्रम आहे. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक हे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशहितासाठी आणण्यात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीयत्वाला धरुन ते असल्याने शिवसेनेने याला पाठिंबा दिला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.


नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत अजून स्पष्टता आणि सत्यता समोर आलेली नाही. त्यामुळे लोकसभेत शिवसेनेनं विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी राज्यसभेत कदाचित पाठिंबा देणार नाही, असा सूचक इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.


या नव्या विधेयकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय शिवसेना राज्यसभेत कदाचित बाजूने मतदान करणार नाही. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी, हे कोणीही शिवसेनेला शिकवू नये, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. यामुळे शिवसेना राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणार का विरोध करणार? यावर संभ्रम कायम आहे.


फडणवीसांचा निशाणा


लोकसभेत पाठिंबा दिल्यावर आता या विधेयकाबाबत राज्यसभेत संदिद्ध भूमिका का?, सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचा दबाव आलाय का? असे सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी टीका केलीय.