Congress MP Rahul Gandhi Declined Offer: काँग्रेसचे नेते राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आल्यानंतर ते पावसाळी अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. मणिपूर मुद्द्यावरुन त्यांनी मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावादरम्यान टीका केली. खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आल्यानंतर आता राहुल गांधींना त्यांचा 12 तुगलक लेनमधील बंगला खासदार म्हणून पुन्हा सुपूर्द करण्यात आला. मात्र आता राहुल गांधींनी सरकारने दिलेली ही ऑफर नाकारली असून जुना बंगला पुन्हा घेण्यास नकार दिला आहे. काँग्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींनी यासंदर्भात लोकसभा हाऊसिंग सोसायटीलाही पत्र लिहिलं आहे.


बंगला पुन्हा दिला पण राहुल गांधींनी नाकारला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींना 'मोदी' अडनाव प्रकरणावरुन सुरतमधील कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने जुलै महिन्यामध्ये या निकालाला स्थगिती दिल्यानंतर खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली. यानंतर 8 ऑगस्ट रोजी लोकसभेच्या हाउसिंग सोसायटीने राहुल गांधींना 12 तुगलक लेन येथील बंगला पुन्हा दिला होता. खासदारांना दिल्लीमध्ये राहण्यासाठी सरकारकडून बंगले दिले जातात. त्या नियमानुसार राहुल यांना खासदारी रद्द झाल्यानंतर हा बंगला त्यांच्याकून काढून घेण्यात आला. हाच बंगला पुन्हा त्यांना देण्यात आला होता मात्र त्यांनी तो नाकारला आहे, असं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे. मध्यंतरी राहुल गांधींना सरकारी बंगल्यासंदर्भात विचारलं असता त्यांनी, "संपूर्ण देशच माझं घर आहे," असं उत्तर दिलेलं.


19 वर्षांपासून याच बंगल्यात वास्तव्य


सूरतमधील कोर्टाने 24 मार्च रोजी 'मोदी' अडनाव प्रकरणामध्ये मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवत 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार 2 वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींची नियुक्ती रद्द करण्याच्या आदेशानुसार ही कारवाई केली गेली. त्यानंतरच राहुल गांधींकडून हा सरकारी बंगला परत घेण्यात आला होता. राहुल गांधींनी एप्रिल महिन्यात या बंगल्याचा ताबा सोडला होता. राहुल गांधी पहिल्यांदा खासदार झाल्यापासून 12 तुगलक लेनमधील बंगल्यातच वास्तव्यास होते. खासदार म्हणून ते मागील 19 वर्षांपासून याच बंगल्यात वास्तव्यास होते. बंगला रिकामा करताना राहुल गांधींनी "मी खरं बोलल्याची किंमत मोजली" असं म्हटलं होतं.


नेमकं राहुल काय म्हणाले होते?


राहुल गांधींनी कर्नाटकमधील कोलारमध्ये 13 सप्टेंबर 2019 रोजी निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या भाषणामध्ये मोदी अडनावावरुन टीका केली होती. "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं अडनाव समान का आहे? सर्व चोरांचं नाव मोदी का असतं?" असं विधान राहुल गांधींनी केलेलं. याच प्रकरणावरुन भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधीविरोधात कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामध्ये राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असता सूरत कोर्टाच्या निकालाला स्थगिती देण्यात आली आणि खासदारकी पुन्हा बहाल केली गेली.