नवी दिल्ली : दिल्लीतील काँग्रेस राष्ट्रवादीची संयुक्त बैठक सकारात्मक झालेली असली तरी अजूनही बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार आहे. आज सकाळी १०.०० वाजता पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन्ही पक्षांची एकत्र बैठक होणार आहे. त्यानंतर दिल्लीतल्या बैठकांचं सत्र संपणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. उद्या पुन्हा मुंबईत आघाडी आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर सत्ता स्थापनेची अंतिम घोषणा केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 'महाशिवआघाडी'त सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय. शिवसेना मुख्यमंत्रिपदासह १६, राष्ट्रवादी १५ तर काँग्रेसला १२ मंत्रिपदं असं या फॉर्म्युल्याचं गणित आहे.



'बुलेट ट्रेन'चा पैसा शेतकऱ्यांकडे वळवणार 


महाराष्ट्रात लवकरात लवकर स्थिर आणि लोकाभिमुख सरकार स्थापन होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलाय... तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्षांची आघाडी सरकार बनवणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत महाशिवआघाडी सरकार स्थापनेबाबत तब्बल साडे चार तास सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. उद्या (शुक्रवारी) पुन्हा आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. सरकार स्थापन करताना आणि सरकार चालवताना तिन्ही पक्षांचा समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाईल. बुलेट ट्रेनला विरोध केला जाईल, आणि तो पैसा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला जाईल. शिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यावर प्राधान्य देण्याचं या बैठकीत ठरलंय. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान उपस्थित होते. आणखी एक-दोन दिवस ही चर्चा सुरू राहणार असल्याचं चव्हाण आणि मलिक यांनी यावेळी सांगितलं.