नवी दिल्ली : परदेश मंत्रालयानं नुकतंच दोन रंगाचे पासपोर्ट देण्यासंबंधी घोषणा केली होती. रोजगाराच्या शोधार्थ परदेशात जाणाऱ्या लोकांना 'भगव्या' रंगाचा पासपोर्ट देण्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ईसीआर' कॅटेगरीत असलेल्या लोकांना निळ्याऐवजी भगव्या रंगाचा पासपोर्ट मिळणार आहे. 'भाजपवर भगव्या रंगाची लागण झालीय... मोदी सरकारचा हा निर्णय 'भेदभाव' दर्शवणारा आहे' अशी टीका करत काँग्रेसनं आपल्या सोशल मीडिया ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केलाय. भाजपच्या या निर्णयामुळे प्रवासी श्रमिकांविरुद्ध 'वर्गवादा'ला प्रोत्साहन मिळेल, असंही काँग्रेसनं म्हटलंय.



'वेगवेगळ्या भारतीय वर्गासाठी वेगवेगळ्या रंगाचा पासपोर्ट भेदभाव दर्शवतो'... असं म्हणत काँग्रेसनं सोशल मीडियावर हॅशटॅग 'ऑरेन्जइजदन्यूब्लू' नावानं एक अभियान सुरू केलंय.


खुद्द काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केलीय. 'भाजप कामगारांसोबत भेदभावपूर्ण वर्तवणूक करते... भाजपच्या या निर्णयामुळे त्यांची विचारसरणी कळते' असं राहुल गांधींनी म्हटलं.



मोदी सरकारच्या नव्या निर्णयानुसार, 'इमिग्रेशन चेक' गरजेचं असणाऱ्या पासपोर्टधारकांना भगव्या रंगाचा पासपोर्ट दिला जाईल तर इतरांचे पासपोर्ट निळ्या रंगाचा असेल. सध्या सरकारी अधिकाऱ्यांचे पासपोर्ट सफेद, भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचे लाल तर इतर सर्व नागरिकांचे पासपोर्ट निळ्या रंगाचे असतात.