नवी दिल्ली : देशभरात Coronavirus कोरोना व्हायरसमुळे तणावाची परिस्थिती असताना मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि येत्या काळात दिसणारे त्याचे परिणाम या मुद्द्यांवर काँग्रेस्या राहुल गांधी यांनी भाष्य केलं. लॉकडाऊनने कोरोनाचा पराभव होणार नाही, हा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी गेल्या काही काळापासून भारत आणि परदेशातील अभ्यासकांसोबत कोविड 19 विषयी संवाद साधत आहे, असं स्पष्ट करत लॉकडाऊन करण्याने कोरोनावर मात करणं शक्य नाही. उलटपक्षी यामध्ये चाचण्या करणं हे सर्वात प्रभावी शस्त्र ठरणार आहे. ज्या पार्श्वभूमीवर त्यांनी चाचण्यांची संख्या वाढवून त्यांची योग्य आखणी करुन देशभरात चाचण्यांचं सत्र सुरु करण्याचा सल्ला सरकारला दिला. 


सध्याच्या घडीला लागू केलेलं लॉकडाऊन आणि त्याचे अर्थव्यवस्था, देशातील उपलब्ध संसाधनं, अन्नधान्य साठा या साऱ्यावर दिसणारे दूरगामी परिणाम त्यांनी अधोरेखित केले. सोबतच परिस्थिती लक्षात घेत भावी काळात देशाच्या अर्थव्यवस्थेवर येणारा ताण पाहता त्या दृष्टीने साचेबद्ध पावलं सरकारकडून उचलली गेली पाहिजेत असा सूर त्यांनी आळवला. कोरोना व्हायरसच्या या आव्हानात्मक काळात भातीयांना सुरक्षितता देण्यासोबतच आपण अर्थव्यवस्थेला हानी तर पोहोचवत नाही आहोत ना याकडेही लक्ष दिलं जाणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. 



लॉकडाऊनच्या काळात अनेकजण आपआपल्या घरांमध्ये आहेत, त्यामुळे धोका कमी दिसत आहे. पण, जेव्हा लॉकडाऊनचा काळ पूर्ण होईल तेव्हा मात्र कोरोनाचा धोका आणखी वाढणार आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेतली गेलीच पाहिजे अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. मोदींची काम करण्याची वेगळी शैली आहे. त्यामुळे माझ्या म्हणणाला टीका न समजता सल्ल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी याकडे पाहावं असं मत त्यांनी सर्वांपुढे ठेवलं.