मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाआधीच तडजोडीचं राजकारण सुरु झालं आहे. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी विरोधकांना एकत्र करण्यासाठी सक्रीय झाल्या आहेत. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर तिसऱ्या आघाडीची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेस कर्नाटक मॉडलसाठी देखील तयार आहे. काँग्रेस जर दुसऱ्या पक्षाचा पंतप्रधान होत असेल तर त्यासाठी देखील तयार असल्याचं चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदानाच्या आधी काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आजाद यांनी याचं संकेत दिले आहे. त्यांनी म्हटलं की, निवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदासाठी जर काँग्रेसला हे पद देण्यासाठी इतर पक्ष तयार नसेल तर काँग्रेस याला मुद्दा बनवणार नाही. काँग्रेसचं लक्ष्य शेतकरी आणि जनविरोधी भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याचं आहे.


गुलाब नबी आजाद यांनी पुढे म्हटलं की, जर केंद्रात आघाडीचं सरकार येत असेल तर काँग्रेस याला प्रतिष्ठेचा विचार करणार नाही. विरोधकांची सत्ता येण्यासाठी काँग्रेस सहभागी होईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर असं लक्षात येतं की काँग्रेस आता मोदींना रोखण्यासाठी पंतप्रधानपदाचा त्याग करण्यासाठी देखील तयार आहे.


काँग्रेस भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी कर्नाटक मॉडलचा डाव खेळू शकते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस तर जेडीएस तिसऱ्या स्थानावर होती. पण काँग्रेसने मुख्यमंत्रीपदासाठी जेडीएसला पाठिंबा दिला. भाजप पक्ष बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरला होता.


लोकसभा निवडणुकीत सगळेच विरोधी पक्ष नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी मैदानात आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमधील प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत नाहीत. त्यामुळे येथे काँग्रेस एकटीच निवडणूक लढवत आहे. २००४ प्रमाणे २०१९ मध्येही सर्व विरोधक एकत्र येत सत्तेत असलेल्या पक्षाला खाली खेचण्यासाठी एकत्र येतील.


२०१९ मध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही असं अनेकांना वाटतं. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते. बुधवारी सोनिया गांधी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना फोन करुन २२,२३ आणि २४ ला दिल्लीत असणार आहात का अशी विचारणा केल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.


तमिळनाडुचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत विरोधी पक्षांची बैठक घेण्यासाठी चर्चा केली. नायडू यांनी २१ मेला बैठक बोलावली आहे. पण अनेक नेत्यांनी २३ मेच्या आधी बैठकीत येण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर तिसऱ्या आघाडीसाठी इतर नेत्यांसोबत चर्चा करत आहेत.