नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हार पत्करावी लागल्यानंतर मध्य प्रदेशातील नेतृत्वाविरुद्ध आवाज उठायला सुरुवात झाली आहे. पार्टीचे सचिव विकास यादव यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रदेश अध्यक्ष बनवा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. सरकारमध्ये पार्टी कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान नाही. म्हणून पार्टीला लोकसभा निवडणुकीत हार पत्करावी लागल्याचा आरोप विकास यादव यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्ष दोन्ही पद हे एकाच व्यक्तिकडे आहेत. अशावेळी पार्टी कार्यकर्त्यांचे ऐकले जात नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे. तसेच शेतकरी कर्जमाफी अर्धवट सुरु आहे. याचे नुकसान पार्टीला भरावे लागत असल्याचेही ते म्हणाले. जर पार्टीने ज्योतिरादित्य सिंधिया यांना प्रदेशाध्यक्ष बनवले नाही तर आम्ही पदाधिकारी राजीनामा देऊ अशी धमकी देखील यादव यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कमलनाथ कॅबिनेटमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटातील मंत्री इमरती देवी यांनी देखील प्रदेशाध्यक्षपदी सिंधियांच्या नावावर जोर धरला आहे. राहुल गांधींकडे या संदर्भात मागणी करेन असे कॅबिनेटमंत्री इमरती देवी म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये देखील मोदी मॅजिक पाहायला मिळाले. इथे भाजपाने 28-1 असा एकहाती सामना जिंकत कॉंग्रेसचा सुपडा साफ केला. मोदींच्या या त्सुनामीत सिंधिया घराण्यातील परंपरागत जागा गुना-शिवापूर देखील वाचली नाही. केवळ कमलनाथ यांचा गड छिंदवाडा वाचला. याजागेवर कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ उमेदवार होते. त्यांनी विजय मिळवत भाजपाच्या नत्थन शाह यांना हरविले.


राहुल राजीनाम्यावर अडून 


लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागल्यानंतर पार्टी अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर अडून बसले आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी पार्टीचे ज्येष्ठ नेते राहुल यांच्याकडे गेले पण आजही कोणता निर्णय झाला नाही. राहुल गांधी आपल्या निर्णयावर कायम असून एका महिन्याच्या आत माझ्याजागी पर्याय शोधा असे त्यांनी सांगितले आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी याबद्दल माहिती दिली. राहुल यांच्या भुमिकेवर कॉंग्रेस पार्टी देखील बघ्याच्या भूमिकेत आहे. राहुल गांधींची मनधरणी करता येईल असे आताही काँग्रेस पार्टीला वाटत आहे.