नवी दिल्ली : राज्यसभा निवडणुकीच्या आधी गुजरात आणि राजस्थानमध्ये हालचाली वाढू लागल्या आहेत. गुजरात काँग्रेसने आपल्या आमदारांना सिरोही येथील रिसॉर्टमध्ये ठेवलं असल्याचे वृत्त आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण पुरोहित यांनी याबाबत तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जून रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. आता विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या ६५ झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर दोन जागा जिंकण्याचे आव्हान आहे. आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला आणखी कोणताही धोका पत्करायचा नाहीये.


गुजरात काँग्रेसने आपल्या आमदारांचे स्वतंत्र असे ग्रुप बनवले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. राजस्थानमधील 20 आमदार देखील सिरोही येथे असल्याचे वृत्त आहे. याशिवाय घोडे-व्यापार होऊ नये म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आमदारांना ठेवण्यात आले आहे.


काँग्रेसमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाने सर्व आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीपर्यंत ते रिसॉर्टमध्ये राहतील. अनेक आमदार रिसॉर्टमध्ये पोहोचले देखील आहेत. यावर मात्र भाजपने आक्षेप घेतला आहे.


कर्जनचे आमदार अक्षय पटेल, कपराडाचे आमदार जीतू चौधरी आणि मोरबीचे आमदार ब्रिजेश मेरजा यांनी या आधी राजीनामा दिला होता. राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिला आहे. यामुळे, 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या ६५ वर आली आहे. सध्या १० जागा रिक्त आहेत.