काँग्रेसने राजस्थान वाचवले पाहिजे, अन्यथा देशभरात वेगळा संदेश जाईल- राऊत
ऑपरेशन कमळ हा सत्तेचा गैरवापर आहे.
कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: काँग्रेस पक्षाने राजस्थानमधील सरकार वाचवले पाहिजे. अन्यथा त्यामुळे देशभरात वेगळा संदेश जाऊ शकतो, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याविषयी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, राजस्थानमध्ये सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन कमळ हा सत्तेचा गैरवापर आहे.
पायलट यांनी जाहीरपणे फडकावले बंडाचे निशाण, ३० आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा
देशाच्या समस्येवर कुणी बोलत नाही. अशावेळी राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी काडी टाकायची, हे चांगल्या राजकारणाचे लक्षण नाही. अशोक गेहलोत आणि सचिन पायट यांच्यातील वैयक्तिक महत्त्वाकांक्षा व लालसेतून हे राजकारण होत आहे. मध्य प्रदेश गेल्यानंतर काँग्रेसने आता राजस्थान वाचवायला हवं. अन्यथा वेगळा संदेश जाईल, असे राऊत यांनी म्हटले.
Rajasthan crisis: सचिन पायलटांनी राहुल गांधींची भेट टाळली; काँग्रेसचे सरकार पडणार?
तसेच महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारचा कोणताही धोका नसल्याचे राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. महाराष्ट्र सरकारला नख लावणं इतकं सोपं नाही. हे मध्य प्रदेश किंवा राजस्थान नव्हे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
दरम्यान, राजस्थानमध्ये अजूनही सत्तानाट्य सुरुच आहे. सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले असले तरी त्यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. तर दुसरीकडे अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये झालेल्या बैठकीनंतर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या बैठकीला काँग्रेसचे १००हून अधिक आमदार उपस्थित होते. त्यामुळे राजस्थान सरकारला कोणताही धोका नाही, असा गेहलोत यांच्या गटाचा दावा आहे.