प्रियंका चतुर्वेदींची काँग्रेसला सोडचिठ्ठी
आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या अपमानजनक वागणुकीमुळे त्या नाराज आहेत.
मध्य प्रदेश : गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या काँग्रेस प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरून काँग्रेस प्रवक्ता हे बिरूद हटवले आहे. आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या अपमानजनक वागणुकीमुळे त्या नाराज होत्या. काही दिवसांपूर्वी त्या मथूरामध्ये असताना राफेल प्रकरणी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रियंका यांच्या समोरच मारहाण केली होती. यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेस कमेटीने कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाई केली. पण त्यानंतर काही कारणामुळे त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. आणि केवळ तंबी देऊन सोडण्यात आले. या सर्व प्रकरणावर प्रियंका यांनी नाराजी व्यक्त केली होती. या संदर्भातील उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे पत्र प्रियंका यांनी पोस्ट केले आहे.
रक्ताचे पाणी करुन कामे करणाऱ्यांपेक्षा मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पार्टी प्रोत्साहन देते हे अत्यंत खेदजनक असल्याचे प्रियंका यांनी म्हटले. पार्टीसाठी मी अभद्र भाषा सहन केली तसेच मारहाण देखील सहन केली. तरीही पार्टीतील ज्या लोकांनी मला धमकी दिली त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे.
प्रियंका चतुर्वेदी या सातत्याने भाजपा सरकारच्या धोरणांवर टीका करत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रोलर्सकडून मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली होती.