नोटाबंदीचा प्रयोग फसलाच; रघुराम राजन यांना काँग्रेसचा पाठिंबा
अर्थव्यवस्थेचे लाखो कोटींचे नुकसान
नवी दिल्ली: मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर परखडपणे टीका करणारे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. रघुराम राजन हे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांनी नोटाबंदीविषयी व्यक्त केलेल्या मताशी देशातील ९९.९० टक्के लोक सहमत असतील, असे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले.
नोटाबंदीविषयी देशातील केवळ एकाच व्यक्तीचे मत इतरांपेक्षा वेगळे आहे. ती व्यक्ती कोण आहे, हे तुम्ही जाणताच. नोटाबंदीचा निर्णय सरकारची मोठी चूक होती. यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नाला (जीडीपी) जवळपास १.५ टक्क्यांच्या फटका बसला. रुपयानुसार याचे मूल्यमापन करायचे झाल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेचे लाखो-कोटींचे नुकसान झाले, असे सिंघवी यांनी म्हटले.
रघुराम राजन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातील कार्यक्रमात २०१६ साली मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविषयी भाष्य केले होते. नोटाबंदी आणि जीएसटी लागू होण्यापूर्वी चार वर्षांपर्यंत भारताचा विकासदर खूपच जास्त होता. मात्र, जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा वेग पकडत होती, नेमक्या त्याचवेळी निश्चलनीकरण आणि जीएसटीमुळे भारताच्या विकासाची गती खुंटली. या विरुद्ध झोतामुळे भारत मागे फेकला गेला, असे परखड मत राजन यांनी मांडले होते.