नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (up election 2022) रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत भाजप, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या तीन पक्षात प्रामुख्याने लढत होत असून सर्वच पक्ष आपल्याच विजयाचा दावा करत आहेत. मात्र, यूपी काँग्रेसने (UPCC) या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना ठरविण्यासाठी विशेष "चक्रव्यूहाची" रचला केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे सत्तारूढ असलेला भाजप ( bjp ) आणि दुसरीकडे भाजपच्या राजीनामा दिलेल्या मंत्री आणि आमदारांना सामावून घेत बलाढय होऊ पाहणार समाजवादी पक्ष ( Samajwadi Party )यांचे आव्हान काँगेसमोर आहे. या पक्षांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस ( congress ) प्रियंका गांधींच्या ( priyank gandhi ) नेतृत्वाखाली नवी ताकद गोळा करत आहे. पक्षाने 125 उमेदवारांच्या यादीत 50 महिलांना तिकीट देऊन आपले इरादे स्पष्ट केले आहेत.


काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी गेल्या वर्षांपासून सुरु केली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये संपूर्ण राज्याची सात विभागांमध्ये विभागणी केली. 1 ते 8 जुलै 2021 या काळात सातही विभागातील 388 विधानसभांमध्ये 'प्रशिक्षण ते पराक्रम' या अंतर्गत 470 प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली.


जिल्हा, शहर आणि ब्लॉक अध्यक्षांना या शिबिरातून प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी काँग्रेस विचारसरणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शिबिरामधून एक टीम तयार करण्यात आली. सुमारे 2 लाख प्रशिक्षित कार्यकर्त्यांची ही मोठी टीम आहे. या टीमला काँग्रेसने 'विचार सेना' असे नाव दिले आहे. हीच विचार सेना या निवडणुकीत मोठी भूमिका बजावणार आहे.


सोशल मीडिया हाताळण्याचे प्रशिक्षण
राज्यातील इतर विरोधी राजकीय पक्षांची नकारात्मक भूमिका, सोशल मीडियाचा प्रभावी वापर आणि बूथ व्यवस्थापनातील बारकावे याची जाणीव या सेनेला करून देण्यात आली. त्याच्या पुढील टप्प्यात सर्व 75 जिल्हा मुख्यालयांवर प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली होती. ज्यात ब्लॉक कमिटी सदस्य, न्याय पंचायती आणि प्रभागांचे अध्यक्ष सहभागी झाले होते. यानंतर विधानसभा स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेतली गेली. 


प्रियांका गांधी सक्रिय
या विशेष सेनेसाठी आयोजित केलेल्या या शिबिरांना स्वतः काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वेळोवेळी ऑनलाइन उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अनेक पटींनी वाढला. यावरून काँग्रेसने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे याचा अंदाज येतो.


काँग्रेसची 'अदृश्य शक्ती' 


या शिबिराचा परिणाम असा आला की, पक्षाचे एक विशेष युनिट पूर्ण ताकदीने काम करत आहे. 'विजय सेना' अर्थात याला काँग्रेसची 'अदृश्य शक्ती'ही म्हटले जात आहे. कारण, ती यूपीच्या कानाकोपऱ्यात तैनात आहे. या सेनेने पक्षाच्या विचारसरणीने सुसज्ज कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले. जे फक्त निवडणुकीच्या काळातच नाही तर आगामी काळातही मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज झालेत. 


विशेष म्हणजे ही टीम तयार करण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेस शांतपणे करत होती आणि विरोधकांना त्याचा थांगपत्ताही लागला नाही.