कोरोनाचे संकट : चीनकडून भारताला मदत, ६.५ लाख किट्सचा पुरवठा
चीनकडून आता भारताला मदत करण्यात आली आहे.
मुंबई : कोरोनाचे मोठे संकट चीनकडून जगात पोहोचले. अनेक देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यात अमेरिका, ब्रिटन, इटली या ठिकाणी मोठा फैलाव होत आहे. हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. चीनलाही कोरोनाचा मोठा फटका बसला. चीननेही कोरोविरुद्धचा लढा यशस्वी केला आहे. आता चीनमध्ये कोरोनाचा फैलाव कमी झाला असून वूहानमधील निर्बंध काहीप्रमाणात उठविण्यात आले आहे. आता चीनमध्ये कोरोनाबाबत काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. चीन कोरोना संदर्भात साहित्य बनविण्याला प्राधान्य देत आहे. भारतातही कोरोनाचा फैलाव होत असल्याने त्याला लगाम घालण्यासाठी प्रयत्न होत आहेत. चीनकडून आता भारताला मदत करण्यात आली आहे. चीनकडून भारताला ६ लाख ५० हजार किट्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यात कोरोना चाचणी आवश्यक साधनांचाही पुरवठा करण्यात आला आहे. हे साहित्य आज भारतात पोहोचणार आहे.
भारताकडून पाठवलेल्या मदतीसाठी आता चीन परतफेड करण्याचा विचार करीत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून भारताला वाचवण्यासाठी चिनी सरकारने मदतीची ऑफर दिली आहे. या संदर्भात, मदतीची पहिली तुकडी आज भारतात पोहोचेल. चीनकडून ६.५ लाख चाचणी किट येत आहेत.
चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिसरी यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाविरोधात लढा देण्यासाठी चीन सरकारने जवळपास ६.५ लाख चाचणी किट पाठवल्या आहेत. येथे सुमारे ५.५ लाख अँटी बॉडी टेस्ट किट आहेत. याशिवाय जवळपास एक लाख आरएनए एक्सट्रॅक्शन किट आहेत. त्यांनी पुढे सांगितले की आज सकाळी चीनच्या ग्वांझ्यू विमानतळावरून हे साहित्य घेऊन एक विशेष विमान भारतासाठी रवाना झाले आहे. हे विमान दुपारपर्यंत पोहोचेल.
या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चीनकडून आलेल्या या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सूत्रांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या बीजिंग दूतावासाच्या माध्यमातून चिनी सरकारशी तपासणी किटसाठी चर्चा सुरु केली. परिपूर्ण सामंजस्याने बसूनच विशेष विमान भारताकडून चीनला पाठविण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता, भारतात आल्यानंतर मदत कार्यात उशीर होऊ नये म्हणून अगोदरच मंजुरी देण्यात आली होती.