भोपाळ : कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. आता ग्रामीण भागात प्राण्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांना मास्क घालण्यात आलं असल्याचं चित्र आहे. बैलांना मास्क घातल्याची घटना भोपाळमधील सिहोर जिल्ह्यातील चंदेरी गावातील आहे. या गावात कोरोनाच्या भीतीने बैलांना मास्क घालून बाहेर घेऊन जाण्यात येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावातील शेतकरी हरिप्रसाद मेवाड, प्रकाश मेवाड यांनी, आपल्या म्हैस, बैलांना कपड्याचे मास्क घातले आहेत. मास्क लावण्यामागचं कारण विचारलं असता त्यांनी, 'कोरोना व्हायरस मनुष्यामध्ये पसरु शकतो तर, कोरोनाचा धोका प्राण्यांनाही असू शकतो. प्राण्यांनादेखील सर्दी होते. त्यामुळे प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास, तो घरापर्यंतही पोहचू शकतो. म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मास्क लावले' असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी आम्ही बैलांना मास्क लावल्यानंतर दुसऱ्या गावातील शेतकऱ्यांनीही त्यांच्या बैलांना मास्क घातलं असल्याचं ते म्हणाले.


शेतकरी हरिप्रसाद मेवाड यांनी, आम्ही सतत हात धुवत आहोत. पंतप्रधानांनी 21 दिवस घरी राहण्याचं आवाहन केलं आहे. मात्र यावेळी गहू आणि चण्याची कापणी हे काम सुरु आहे. त्यामुळे अतिशय सावधगिरी बाळगून आम्ही शेतात जातोय. स्वत:सह आम्ही प्राण्यांनाही मास्क लावत असल्याचं त्यांनी सांगितलं. 


शेतकरी प्रकाश मेवाड यांनी सांगितलं की, याआधीदेखील संसर्गावेळी अशाप्रकारे प्राण्यांना मास्क लावण्यात आले आहेत. आमचे वडिलही असं करायचे. आता आम्ही कोरोनाच्या धोक्यामुळे अशाप्रकारे प्राण्यांची सुरक्षा करतोय.


या प्रकरणात, पशुवैद्यकीय डॉक्टरांचं मात्र एक वेगळं म्हणणं आहे. डॉक्टर भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार प्राण्यांमध्ये संसर्गजन्य नाही. कोरोना केवळ मनुष्यातून मनुष्यामध्येच संक्रमित होतो. प्राणी यापासून सुरक्षित आहेत. त्यामुळे बैलांना मास्क लावण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलंय.