मुंबई : देशात एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ६० टक्क्यांपेक्षा जास्त झालं आहे. देशात कोरोना रुग्ण वेळत आढळल्यामुळे आणि त्यांच्यावर वेळेत उपचार केल्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट ६०.७३ टक्के एवढा झाला आहे. मागच्या २४ तासात २०,०३३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३,७९,८९१ एवढी झाली आहे. तर देशात २,२७,४३९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 


देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ६,२५,५४४ एवढी आहे. यातल्या ३,७९,८९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १८,२१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


महाराष्ट्रातली परिस्थिती काय?


एकीकडे देशातला कोरोनाचा रिकव्हरी रेट ६०.७३ टक्के असताना महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ५४.२४ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत १,०४,६८७ रुग्ण बरे होऊन घरी परत गेले आहेत. आजच्या एका दिवसात ३५१५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 


राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १,९२,९९० एवढी आहे. यातले ७९,९११ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आत्तापर्यंत ८,३७६ जणांचा कोरोनमुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.३४ टक्के एवढा आहे.