नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतामध्ये कोरोनाचे ३९७ रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ७४ रुग्ण आहेत. कोरोनाचा हा प्रसार रोखण्यासाठी देशातली अनेक राज्य उद्यापासून लॉकडाऊन करणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा धोका वाढत असतानाही नवी दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरु आहे. पण आता कोरोनामुळे या अधिवेशनात सोमवारपासून न जाण्याचा निर्णय शिवसेना खासदारांनी घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांनी हा खबरदारीचा उपाय घेतला आहे. कोरोनामुळे दिल्ली लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. 


३ एप्रिलपर्यंत संसदेचं अधिवेशन चालणार आहे. याआधी शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना अधिवेशनासाठी दिल्लीला न जाण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे अधिवेशन संपवण्यात यावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातली रेल्वेसेवा आधीच ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसंच राज्यातील एसटी बस सेवा, मुंबईतील बेस्ट बस सेवा खासगी बसही बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जमावबंदी लागू केल्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. 


जीवनावश्यक कारणांसाठीच बससेवा सुरु राहणार आहे, तसंच रेल्वेने फक्त मालवाहतुकीला परवानगी दिली आहे. अन्नधान्य, औषधं, भाजीपाला, बँका या कालावधीमध्ये सुरु असणार आहेत. शासकीय कार्यालयामध्येही फक्त ५ टक्के कर्मचारीच काम करणार आहेत.