Corona India Update: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढू लागले आहेत. केंद्र सरकारने संसर्गाच्या वाढत्या वेगाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्र सरकारनेही कोरोना रोखण्यासाठी पाच राज्यांना पत्र लिहिलं आहे. दिल्ली-महाराष्ट्रासह पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना संसर्ग रोखण्यासाठी योग्य पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राने पाच राज्यांना दिले निर्देश 
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रसह केरळ, दिल्ली, हरियाणा आणि मिझोराम या राज्यांना कोरोनाची वाढलेली प्रकरणं गांभीर्याने घेण्यास सांगितलं आहे. राजेश भूषण यांनी संबंधित विभागांना कोरोनाच्या प्रकरणांवर सतत लक्ष ठेवण्याचं आणि संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत.


नवीन व्हेरियंट 'X-E' बाबत चिंता
राजेश भूषण यांनी पाच राज्यांना संक्रमणाविरूद्ध पाचसूत्री धोरणांचा अवलंब करण्यात सांगितलं आहे. यात चाचणी, रुग्णवाढीवर लक्ष, उपचार, लसीकरण आणि खबरदारी यांचा समावेश आहे. यापूर्वी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनीही राज्यांना कोविड-19 च्या नवीन प्रकार 'X-E' बाबत खबरदारी आणि योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत त्यांनी देशातील आघाडीच्या तज्ज्ञांची बैठकही घेतली.


आरोग्य मंत्रालयाने जारी केलं निवदेन
आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जारी केलं आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधांच्या उपलब्धतेचा सातत्याने आढावा घेणं,  लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यावर आणि सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा असं या निवेदनात म्हटलं आहे. 


24 तासात 796 नवे रुग्ण
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 796 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 4,30,36,928 झाली आहे. देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 10,889 आहे. गेल्या 24 तासांत 19 कोरोना बाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून, आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 5,21,710 झाली आहे.