रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण
डॉक्टरला कोरोनाची लागण...
नवी दिल्ली : कोरोनाग्रस्त रुग्णाचा इलाज करणाऱ्या डॉक्टरलाच कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला डॉक्टर, दिल्लीतील रुग्णालयात दाखल आहे.
संसर्ग झालेल्या डॉक्टरांनी, दुबईहून आलेल्या एका कोरोनाग्रस्त महिलेवर उपचार केल्याची माहिती आहे. दुबईहून आलेली महिला आधी कोरोना संशयित होती. त्यामुळ तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर महिलेची चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.
कोरोनाग्रस्त महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर, तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचीही चाचणी करण्यात आली. चाचणीनंतर डॉक्टरही कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. सध्या डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत.
संपूर्ण भारतात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 467 झाली आहे. त्यापैकी 34 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज करण्यात आलं आहे. तर भारतात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण भारतात महाराष्ट्र राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक 97 इतकी आहे. तर केरळ दुसऱ्या क्रमांकावर असून कोरोना रुग्णांचा आकडा 95 आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत भारतात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईत ३, कर्नाटकमधील कलबुर्गीमध्ये 1, बिहारमधील पटनात 1, सुरत, कोलकाता आणि दिल्लीमध्ये एका व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू झालाय. संपूर्ण भारतात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असून जनतेला घाबरुन न जाता, सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे.