नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटाचा परिणाम आता जगातील तेल बाजारावरही दिसण्याची मोठी शक्यता आहे. जगातील मोठी तेल उत्पादनं, कोरोनामुळे आपलं उत्पादन कमी करू शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कायम ठेवण्याची मागणी लक्षात घेता या आठवड्यात ओपेक आणि त्याच्या सहयोगी संघटनांची बैठक होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या तेलाच्या वर्षाभरातील किंमतीच्या तुलनेत, आता सध्या कच्च्या तेलाच्या किंमती सर्वात कमी आहेत. जानेवारी महिन्यापासून कच्च्या तेलाच्या किंमतीत २० टक्क्यांची घसरण झाली आहे. 


का कमी होतायेत तेलाच्या किंमती?


जगात चीन, सर्वाधिक पेट्रोल-डिझेलची खरेदी करणारा देश आहे. परंतु कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चीनमध्ये प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे फॅक्टरी, ऑफिसेस, दुकानं बंद आहेत. त्यामुळे जगातील सर्वाधिक पेट्रोल-डिझेलचा वापर करणारा देश आता सर्वात कमी तेलाची खरेदी करतो आहे. 


चीन साधारणपणे दररोज सरासरी १ कोटी ४० लाख बॅरल तेलाचा वापर करतो. पण सध्या कोरोना व्हायरसमुळे लोक घरातून जास्त बाहेर पडत नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर अतिशय कमी झाला आहे. त्यामुळेच आता चीनकडून इतक्या मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी होणं कठीण आहे. 


चीनमध्ये प्रवासावर निर्बंध लागू आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम होतो आहे. कोरोना संकटामुळे, विमानांकरिता वापरण्यात येणारं जेट इंधनही कमी प्रमाणात वापरलं जात आहे. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय विमान सेवांमध्येही कपात केली जात आहे.


ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनमध्ये कच्च्या तेलाच्या वापरात २० टक्क्यांची घसरण झाली आहे. चीनमध्ये पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाल्यामुळे याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरही पाहायला मिळतोय. त्यामुळे सर्वच देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.


चीनमधील थिंक टँक चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सचे अर्थशास्त्रज्ञ झांग मिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे देशाची अर्थव्यवस्था वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत, पाच टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. 


चीन जगातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे, जागतिक अर्थव्यवस्थेत जे काही बदल होत आहेत, त्यात चीनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे चीनवर कोरोना व्हायरसच्या संकटाचा नकारात्मक परिणाम झाला, तर याचा फटका जगातील सर्वच देशांवर होण्याची शक्यता आहे.