काश्मिरी विद्यार्थ्यांकडून आयसोलेशनला विरोध; विमानतळावर तोडफोड
विद्यार्थ्यांकडून विमानतळावर तोडफोड करण्यात आली.
नवी दिल्ली : बांगलादेशात शिक्षण घेणारे काश्मीरी विद्यार्थी कोरोनाच्या भीतीने भारतात परतले. बांगलादेशातून श्रीनगर विमानतळावर हे विद्यार्थी उतरले. पण विमानतळावर नियमांचं पालन करण्यास या विद्यार्थ्यांनी चक्क नकार दिला. विद्यार्थ्यांनी वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. त्यानंतर आयसोलेशनमध्ये जाण्यााबाबत सांगण्यात आल्यानंतर त्यांनी विमानतळावर तोडफोड करण्यास सुरुवात केली .
विद्यार्थ्यांकडून विमानतळावर तोडफोड -
कोरोनामुळे बांगलादेशातून तब्बल 160 विद्यार्थी भारतात आले. या 160 विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आयसोलेशनमध्ये जाण्यास सांगितलं. मात्र आयसोलेशनमध्ये जाण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला. एवढंच नाही तर त्यांनी आयसोलेशनमध्ये जाण्यास नकार देत तोडफोड करण्यास सुरु केली.
भारतात प्रवासावर बंदी, लॉकडाऊनसह अनेक महत्त्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत. प्रत्येक विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात येतेय. त्याशिवाय आयसोलेशनची प्रक्रियाही अतिशय गंभीरतेने पूर्ण करण्यात येत आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमधील विमानतळावर बांगलादेशात शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थ्यांनी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनाबाबत खबरदारीच्या या उपायांचा विरोध केला.
विद्यार्थ्यांनी विमानतळावरीन खिडक्यांची तोडफोड सुरु केली. या तोडफोडदरम्यान विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी ही संपूर्ण परिस्थिती हाताळत पोलीसांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं.
दरम्यान, भारतात आतापर्यंत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 300 अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्वच शहरांमध्ये शुकशुकाट असून नागरिकांकडूनही जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळतोय. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून जनता कर्फ्यू सुरु झाला असून रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.