पंतप्रधानांच्या आईचा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना सलाम
कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी संध्याकाळी ५ वाजता थाळी आणि टाळी वाजवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं.
मुंबई : कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी संध्याकाळी ५ वाजता थाळी आणि टाळी वाजवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. पंतप्रधानांच्या या आव्हानाला देशभरात जनतेने उत्सफूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधानांच्या आईंनीही थाळी वाजवून कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्यांच्या आईने थाळी वाजवल्याचा व्हिडिओ शेयर केला आहे. या व्हिडिओसोबतच पंतप्रधानांनी आणखी २ व्हिडिओ शेयर केले आहेत. यातल्या एका व्हिडिओमध्ये वृद्ध महिला टाळ्या वाजवत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी एक वृद्ध महिला बाटली भिंतीवर आपटत आहे.
'आई... तुमच्या सारख्या कोट्यवधी मातांच्या आशिर्वादामुळे डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, पोलीस, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळाली आहे आणि पुढे काम करण्यासाठी बळ मिळालं आहे,' असं मोदी म्हणाले आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, शरद पवार, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही टाळ्या, थाळ्यांचा नाद करत कृतज्ञता व्यक्त केली.