नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांशी चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान यांच्यातही बोलणं झालं, तसंच शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही बोलले. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आम्ही सोबत असल्याचा विश्वास पवारांनी पंतप्रधानांशी बोलताना दर्शवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य केलं जाईल, तसंच कोरोना संकटाचा सामना केला जाईल, असं पवार पंतप्रधानांशी बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी फोनवर संवाद साधला. सोनिया गांधी, मुलायम सिंह, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, केसीआर, स्टॅलिन यांच्यासोबतही पंतप्रधानांनी कोरोनाबाबत चर्चा केली.


काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता.


महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ७४८ पर्यंत पोहोचली आहे. मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ११३ रुग्ण वाढले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईमध्ये सर्वाधिक ३० रुग्ण दगावले आहेत. तर ठाणे जिल्ह्यात ६, पुण्यात ५, औरंगाबाद, बुलडाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, हिंगोली, गोंदिया, सिंधुदुर्गात प्रत्येकी १-१ रुग्ण कोरोनामुळे दगावला आहे.  


गेल्या २४ तासात राज्यात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक ८१ रुग्ण वाढले, तर पुण्यात ही संख्या १८ने वाढली. औरंगाबादमध्ये ४, अहमदनगरमध्ये ३, कल्याण डोंबिवलीमध्ये २, ठाण्यात २, उस्मानाबादमध्ये १, वसईमध्ये १ आणि दुसऱ्या राज्यातला १ रुग्ण वाढला आहे.