आता कायमची बंद होणार कोरोनाच्या कॉलरट्यूनची भुणभूण?
दूरसंचार कंपन्यांकडून कोरोनाची जनजागृती करण्यासाठी विशेष कॉलरट्यून लावण्यात आली होती.
कोरोनाने भारतात थैमान माजवल्यानंतर दूरसंचार कंपन्यांकडून कोरोनाची जनजागृती करण्यासाठी विशेष कॉलरट्यून लावण्यात आली होती. मात्र लवकरच ही घोषणा आता इतिहास बनणार आहे. या कोरोनाबाबत सुमारे दोन वर्षांच्या जनजागृतीनंतर, सरकार आता कॉल करण्यापूर्वी कोविड-19 संदेश काढून टाकण्याचा विचार करतंय.
कोरोना संदेश आणि कॉलरट्यून काढण्यासाठी लिहिलं पत्र
सरकारला असं अनेक अर्ज प्राप्त झालेत, ज्यामध्ये म्हटलंय की या मेसेजचा आता उद्देश पूर्ण केला आहे. काहीवेळा आपत्कालीन काळात महत्त्वाचे कॉल्स लावताना या कॉलरट्यूनमुळे उशीर होतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाने (DOT) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून या कॉलरट्यून मागे घेण्याची विनंती केली आहे. यामध्ये सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (COA) तसंच मोबाइल ग्राहकांकडून मिळालेल्या अर्जांचा उल्लेख करण्यात आला आहे.
टेलीकॉम सर्विस प्रोवायडर लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी तसंच यावेळी कोणती खबरदारी घ्यायची आणि लसीकरणांबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी कॉल करण्यापूर्वी कॉलरट्यून लावण्यात आली होती.
दूरसंचार विभागाने मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की ''जवळपास 21 महिन्यांच्या कालावधीनंतर, या कॉलरट्यूनमुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने काम केलंय."