नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४९ झाली आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आज देशात ४ जणांना जीव गमवावा लागला आहे. केंद्र सरकारने राज्यांना कोरोनासाठी वेगळी रुग्णालयं बांधायला सांगितली आहेत. यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलासादायक बातमी दिली आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असली, तरी या वाढीचा दर कमी झाला आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशात कोरोनाच्या संक्रमणाचे आकडे वाढत आहे, पण वाढीचा दर कमी झाला आहे. असं असलं तरी हे सुरुवातीचे कल आहेत. देशात कोरोनाचे ४१ नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे मागच्या २४ तासात ५ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ६४९ झाली आहे,' अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.


'समाज आणि सरकार यांनी एकत्र येऊन काम केलं नाही आणि लोकांनी नियम पाळले नाहीत, तर कोरोना व्हायरस समाजात पसरेल. एकमेकांपासून लांब राहून आणि योग्य उपचार घेऊन कोरोनाला लांब ठेवता येईल', असं वक्तव्य लव अग्रवाल यांनी केलं.


'सरकार आवश्यक वस्तूंचं उत्पादन आणि त्याच्या वितरणावर लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा प्रभावित होऊ नयेत, याची आम्ही काळजी घेत आहोत. प्रवासी आणि मजुरांना जेवण तसंच राहण्याची सोय करण्याचं काम राज्य सरकार करत आहे,' असं गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्या सलिल श्रीवास्तव म्हणाले.


महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२२ वरून १२८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल २१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.