सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : 'क्यो कोरोना कैसे हो....', अशा काहीशा बोचऱ्या स्वरांतच त्यांचं आपल्या हक्काच्या गावात स्वागत झालं. हे खरंतर काहीसं अनपेक्षित होतं पण तरीही सध्याची परिस्थिती पाहता या स्वागताचाही या व्यक्तीने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकार केला. नावाबाबत गोपनीयता पाळण्याच्या अटीवर या व्यक्तीने त्याचा मुंबईतून वाराणासीपर्यंतचा लॉकडाऊनदरम्यान्च्या प्रवासाचा उलगडा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या मालाड या भागास राहणारं एक उत्तर भारतीय कुटुंब दाटीवाटीच्या वस्तीत असणारा कोरोनाचा धोका पाहता इतर सर्वांप्रमाणेच आपल्या गावाला जायच्या दिशेने निघालं. खासगी वाहनाने त्यांनी १० मे २०२० च्या सुमारास पहाटे तीन वाजण्याच्या सुमामरास त्यांनी वाराणासी रोखाने हा प्रवास सुरु केला. जवळपास १६०० किलोमीटरचं हे अंतर कापताना त्यांनी पाहता पाहात मुंबई आणि महाराष्ट्राला बरंच मागे टाकलं. या प्रवासात तीन ते चारवेळा निर्धारित चौक्यांवर त्यांच्या शरीराच्या तापमानाची तपासणी करण्यात आली.


तापमानाची ही तपासणी वगळता वाटेत प्रवासादरम्यान इतर कुठेही कोणतीही अडचण आली नाही. उलटपक्षी अनेक ठिकाणी माणुसकीच्या नात्याने काही मदतीचे हात आमच्यापुढे आले, असं 'तो' म्हणाला. 'प्रवास मोठा होता, सोबतीला मोठ्या भावाचं संपूर्ण  कुटुंब (मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि दोन लहान मुलं) असल्यामुळे आम्ही सर्वांनीच खाण्याचे पदार्थ, पिण्याचं पाणी सोबत नेलं होतं. शक्य होतं तिथे थांबून काही वेळासाठी विसावा घेत आम्ही पुढील रोखाने प्रवास सुरु केला.'


अक्षरश: रस्त्यात दगड रचून चूलही लावली. हा अनुभव बरच काही शिकवून जाणारा होता, असं म्हणत त्यानं आजुबाजूला होणाऱ्या बदलाची एक विचित्र अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळत असल्याचं चित्र समोर ठेवलं. अनेकदा प्रवास संपूच नये असं वाटतं, पण इथे मात्र आता हा प्रवास संपावा हीच इच्छा त्यांच्या मनात होती. 


Lockdown : OLAमधील हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता 


अखेर तो प्रवास संपला. वाराणसीमधील, महागाव येथे हे कुटुंब पोहोचलं. सोशल डिस्टन्सिंग, क्वारंटाईन याबाबतचं भान असल्यामुळे कलाविश्वात दिग्दर्शन आणि छायांकनाच्या क्षेत्रात आपला जम बसवू पाहणाऱ्या आणि अगदीच सुरुवातीच्या दिवसांमघ्ये असणाऱ्या या व्यक्तीच्या कुटुंबानं क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.


''गावची घरं मोठी असल्यामुळे येथे क्वारंटाऊन होण्यात काही अडचण आली नाही. आम्ही घराच्याच बाहेर गेस्ट हाऊसवजा एका खोलीमध्ये सुरक्षित अंतर पाहून चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन झालो. आज या गोष्टीला जवळपास आठहून अधिक दिवस उलटले. आपल्यामुळे घरात असणाऱ्या वयोवृद्ध आई- वडील आणि इतर मंडळींना त्रास होऊ नये यासाठीच आम्ही स्वत:हून हा निर्णय घेतला. पण, ते म्हणतात ना हवा का रुख बदला है.... तसंच चित्र इथे पाहायला मिळालं.
गावात आल्यापासून इथे सुरु असणाऱ्या चर्चा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची उत्तर प्रदेशातील काही भागांत होणारी वाहवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी कुछ करेंगे, योगी जी कुछ करेंगे असं म्हणणाऱ्या मंडळींच्या एकंदर भूमिका या काळजीपेक्षा राजकीय वादाकडे जास्त झुकणाऱ्या वाटू लागल्या. बरं हे इतक्यावरच थांबलं नाही. आम्ही थेट मुंबईहून गावात आलो आहोत, तर जणू माणसाच्या रुपात कोरोनाच गावात येऊन धडकला आहे, अशाच आवेशात आमच्याकडे पाहिलं जाऊ लागलं.


 


अर्थात, गावातले सगळेच लोक असे नसले, तरीही जितक्यांचा यात सहभाग होता तो मात्र मनाला चटका लावणारा. क्रिकेट खेळणारी, कशाची साधी समजही नसणारी मुलंही क्यो कोरोना कैसे हो..... असं म्हणत स्वागत करत होती. आता तेच असे म्हणतात म्हटल्यावर वरिष्ठांकडूनही काय अपेक्षा करावी म्हणा. झालं तेच..... गावातील काही वयाने मोठ्या असणाऱ्यांच्या तोंडीही अशाच आशयाचे उदगार आणि त्या संशयित नजरा मनात कोलाहल करुन गेल्या. परिस्थिती आताही बदललेली नाही. पण, तरीही आता पुढील काही दिवस किमान यांच्या मनात कोरोनाबाबतचे संभ्रम दूर होईपर्यंत तरी हे असंच स्वागत आणि ही विचित्र स्वरुपाची काळजीच आपल्या वाट्याला येणार आहे हे आम्ही स्वीकारलं आहे.''


आपल्या अनुभवाचं अतिशय सकारात्मकतेने कथन करत असताना त्याने अखेरीस एक चपखल उत्तरही दिलं. 'क्यो कोरोना कैसे हो?', असं म्हणत चौकशीतूनही टोलेबाजी करणाऱ्या या मंडळींना जे उत्तर दिलं तेच मी इतरांनाही सांगू इच्छितो, बघा पटतंय का.... ''भाईसाहब इन्सानोंको कोरोना होता है, कोरोना इन्सान नही होता''.


SAYALI.PATIL@zeemedia.esselgroup.com