Corona : लॉकडाऊनदरम्यान घरी राहणाऱ्यांसाठी `या` पर्वतारोहण संस्थेचा मोठा निर्णय
नेहमी फिरस्तीवर निघणाऱ्यांसाठी.....
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. संपूर्ण देशभरात सुरु असणारा Coronavirus कोरोना व्हायरसचा कहर पाहता याच्या वाढत्या प्रादुर्भावास रोखण्य़ासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं. मोदींच्या या निर्णयाला संपूर्ण देशभरातून पाठिंबा देण्यात आला.
सर्वच क्षेत्रांतून प्रत्येकानेच घरी राहत कोरोना व्हायरसची ही साखळी तोडण्यात योगदान दिलं. नेहमी फिरस्तीवर निघणाऱ्यांना आपुलकीने आमंत्रित करणाऱ्या अनेक कंपन्यांनीही अशा मंडळींना या प्रसंगी स्वत:च्याच घरी सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यातच आता आणखी एक नावही जोडलं गेलं आहे.
हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट अर्थात हिमालयन पर्वतारोहण संस्थेकडून एक आगळीवेगळी शक्कल लढवत पर्वतप्रेमींना आणि सर्वांनाच घरीच थांबण्याचं आवाहन केलं आहे.
“HMI, 21 Days Big Boss Indoor Challenge- Fight Against COVID-19” अशा नावाने त्यांनी हे आवाहन सर्वांनाच केलं आहे. ज्याअंतर्गत जवळपास तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनदरम्यान घरीच राहणाऱ्यांना दार्जिलिंग येथे फिरायला जाण्याची संधी मिळणार आहे तीसुद्धा अगदी मोफत. दोन विभागांमध्ये या आवाहनाची आखणी करण्यात आल्याचं कळत आहे.
विभागणीनुसार एक वर्ग हा एचएमआयच्या सभासदांसाठी असेल आणि दुसरा हा खुला प्रवर्ग असेल. याचविषयी अधिक माहिती देत संस्थेच्या मुख्याध्यापकपदी असणाऱ्या ग्रुप कॅप्टन जय किशन यांनी लॉकडाऊनला पाठिंबा देण्याचा हा आपला एक प्रयत्न असल्याचं सांगितलं. यामध्ये सहभागी होण्यासाठी घरी असतेवेळचे व्हिडिओ, फोटो, योगाभ्यास हे संस्थेच्या संकेतस्थळावर अपलोड करणं अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.